‘ओटीटी’मुळे लेखक बिझी, पण निर्माते पैसेच देत नाहीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे लागलेल्या कडक निर्बंधांमुळे प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये जाऊ शकत नाही, अशावेळी ओटीटी प्लॅटफॉर्म हेच मनोरंजनाचे माध्यम बनले आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, डिस्ने प्लस हॉटस्टार, वूट असे लोकप्रिय पर्याय प्रेक्षक आणि निर्मात्यांसमोर आहेत. याचा फायदा  लेखक मंडळींना झाला आहे. सध्या बऱयाच लेखकांचे काम वाढले आहे. मात्र सिनेमा प्रदर्शित होण्यास वेळ लागत असल्याने लेखकांना कामाचे पैसे वेळवर मिळत नाहीत.

कोरोना काळात ओटीटीमुळे सध्या अनेक लेखक एकावेळी अनेक प्रोजेक्टवर काम करत आहेत. त्यामुळे लेखकांकडे कामाचा ओघ खूपच चांगला आहे. मात्र निर्मात्यांकडून मिळणाऱया मानधनाबाबत ते समाधानी नाहीत. हातात काम असणे आणि त्याचे पैसे मिळणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या असल्याचे सिनेलेखक रविंद्र रंधवा यांनी सांगितले.

कोरोना काळात काम वाढले आहे. जर लेखकांना या गतीने कामे मिळत राहिली तर वर्षभरात त्यांचे उत्पन्न 20 लाखापर्यंत सहज जाऊ शकते. अनेक लेखक एकाचवेळी अनेक प्रोजेक्टसवर काम करीत आहेत, जेणेकरून कुठून ना कुठून पैसे येत राहावेत. – दुर्गेश सिंह, पटकथा लेखक

ओटीटीमुळे लेखकांना काम मिळते आहे. पण सिनेमा थिएटरमध्ये  प्रदर्शित झाले पाहिजेत. त्यामुळे लेखकांचे अडकलेले पैसे मिळतील.  – स्वानंद किरकिरे,लेखक

ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमा आणि प्रेक्षक संख्या येत्या काळात वाढणार आहे, यात शंका नाही. बरेचसे मोठे सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतात. सूर्यवंशी, हाथी मेरे साथी, अमिताभ बच्चन यांचा चेहरे या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. सूर्यवंशी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

एप्रिलमध्ये वेबसीरिजचा धडाका

मुमभाई 2– अॅक्शन थ्रीलर वेबसीरीज ‘मुमभाई 2’ ही वेबसीरिज 18 एप्रिलपासून झी 5 प्लॅटफॉर्मवर बघता येईल. एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस आणि गुंड यांच्यातील लढय़ाची ही कहाणी आहे.

द फॅमिली मॅन 2– अभिनेता मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’चा दुसरा सीझन 28 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राईमवर येतोय. या वेबसीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

कर ले तू भी मोहब्बत 4– अभिनेत्री साक्षी तन्वर आणि राम कपूर यांचा अभिनय असलेली ‘कर ले तू भी मोहब्बत’चा चौथा सीझन लवकरच अल्ट बालाजी प्लॅटफॉर्मवर बघता येईल.

हॅलो चार्ली– आदर जैन, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव यांची भूमिका असलेला ‘हॅलो चार्ली’ सिनेमा प्रेक्षकांना हसवायला येत्या 9 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होत आहे. ‘हॅलो चार्ली’ हा एक धमाल कॉमेडीपट आहे.