आमचा ऍक्शन प्लॅन तयार, नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने आमचे मनोबल खच्ची होणार नाही. नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाई यापुढेही सुरूच ठेवून नक्षली कारवाया करणाऱयांना जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यासाठीचा आमचा ऍक्शन प्लॅन तयार आहे. लवकरच ते कृतीतून दिसेल असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी दिला.

गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन पोलीस महासंचालक जायस्वाल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा हल्ला आयईडीद्वारे स्फोट घडवून केला होता. यासाठी कशाचा वापर केला गेला आणि नक्षलवाद्यांच्या कुठल्या दलाने हा स्फोट घडवला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीत खोडा घालण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न मोडून काढल्यामुळे नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. पोलीस दल गाफील नव्हते. आताच्या परिस्थितीचा आढावा घेऊन कारवाईत सुधारणा करू. मी स्वतः गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक पदावर काम केले आहे. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आताच्या परिस्थितीनुसार आढावा घेऊन नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवावाईच्या रणनीतीत बदल करण्यात येणार असल्याचे जायस्वाल म्हणाले.

गडचिरोलीत सुरू असलेल्या नक्षली कारवाया व नक्षलवाद्यांच्या आव्हानांचा सखोल अभ्यास करून पुढची रणनीती आखण्यात येईल. अशा घटना पुन्हा होणार नाहीत याचीही काळजी घेण्यात येईल. झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत. या हल्ल्यातून नक्कीच धडा घेऊ. पोलीस दल यापुढील काळात परिणामकारक कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले.

गाडीचालकाला शहीदाचा दर्जा

नक्षलवादी हल्ल्यात ठार झालेल्या गाडीच्या चालकालाही शहीदाचा दर्जा दिला जाईल. त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत केली जाईल, असे जायस्वाल म्हणाले.