लातूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारासह लोकप्रतिनिधीविरोधात संताप; गावा-गावात प्रचाराचे ताफे अडवले

लातूर लोकसभा मतदारसंघातील देवणी तालुक्यातील बोरोळ आणि धनेगाव येथे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाहनांचा ताफा अडवण्यात आला. तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांच्या कलमुगळी गावात भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवण्यात आला. ‘एक मराठा, लाख मराठा’ च्या घोषणा देत गावातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडले गेले. प्रचारासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन या आमदारांना आता मतदारसंघात फिरावे लागत आहे.

मराठा आरक्षण मुद्यावर लातूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारासह लोकप्रतिनिधी विरुद्ध संतापाची भावना उमटत आहे. प्रचार सभेसाठी आलेले वाहनांचे ताफे अडववण्यात येत आहेत. मराठा समाज सर्वत्र आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येते आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेने भाजपच्या ताफ्यांचे स्वागत होत असून बैठक, सभा न घेताच त्यांना परतावे लागत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर शासनाने फसवणूक केली म्हणून मराठा समाज आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. मराठा आरक्षणावर शासनाने फसवणूक केल्याची समाजाची भावना आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक भूमिका घेत आहे. प्रचारासाठी गावात आलेल्या भाजपच्या ताफ्यातील वाहनांना अडवले जात आहे. तुम्ही आम्हाला मतदान करा म्हणून सांगायची गरज नाही. कुणाला मतदान करायचे हे आम्हाला समजते, तुम्ही गुमान निघा आता असे नेत्यांना सांगण्यात येत आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ च्या घोषणा देत भाजपच्या ताफ्याला निघून जाण्यासाठी भाग पाडले जात आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा मतदारसंघातील कलमुगळी हे भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांचे गाव. या गावातच विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांचा वाहनांचा ताफा अडवण्यात आला.

लातूर लोकसभा मतदारसंघातील देवणी तालुक्यातील बोरोळ आणि धनेगाव येथे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाहनांचा ताफा अडवण्यात आला. पोलीस बंदोबस्त घेऊन भाजप आमदारांना फिरावे लागत आहे. दोन्ही आमदारांना त्यांच्या मतदार संघात रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सध्या त्यांचे मतदार संघ ही त्यांच्या हातात राहिलेले नाहीत अशी प्रतिक्रिया उमटत आहे.