श्रीलंकेत इसिसचे 130 संशयित दहशतवादी असल्याची शक्यता; राष्ट्रपती सिरीसेना यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेत इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेले सुमारे 130-140 संशयित असल्याची माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी दिली आहे. ‘संशयितांपैकी सुमारे 70 जणांना अटक करण्यात आली आहे. इतर संशयितांनाही लवकरच अटक केली जाईल. तसेच, देशातील दहशतवादाचे जाळे नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण सचिव आणि पोलीस महानिरीक्षक त्यांचे कर्तव्य बजावण्यात असमर्थ ठरल्याने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवादी कारवाईची पूर्वसूचना देणारी माहिती मिळाल्यावर त्यांनी ती तातडीने वरिष्ठांना दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याची कारवाई करण्यात आली.

आठवड्याभरापूर्वी श्रीलंकेत आठ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. ‘ईस्टर संडे’ला चर्चमध्ये झालेल्या स्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. मात्र, श्रीलंकेतील नॅशनल तौहित जमात या दहशतवादी संघटनेने हे कृत्य केल्याचा संशय श्रीलंका सरकारने व्यक्त केला आहे. सिरीसेना यांनी पोलिस महानिरीक्षक आणि सुरक्षा सचिव यांना राजीनामा देण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर शुक्रवारी पोलीस महानिरीक्षक पुजुत जयसुंदरा यांनी राजीनामा संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तर, फर्नांडो यांनी आपला राजीनामा सिरीसेना यांच्याकडे दिला आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेले श्रीलंकेतील काही संशयित पुन्हा मायदेशी परतल्याची माहिती सरकारला होती. मात्र, परदेशातील दहशतवादी संघटनेत सहभागी होणे हे श्रीलंकेतील कायद्याच्या विरोधात नसल्याने त्यांना अटक करणे शक्य नसल्याचे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले. त्या संघटनेतील संशयितांनी हा घातपात घडवल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.