
जिल्हा शासकीय रुग्णालयातून दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजन मशीनची चोरी झाल्यानंतर आता घसा तपासणी मशीनही चोरीस गेली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे चोरी होत असल्याने डॉक्टरही चिंताग्रस्त झाले आहेत. मशीनशिवाय रुग्णांना तपासायचे कसे, असा त्यांना प्रश्न पडत आहे. याबाबत परिसेविका शोभा पोतदार यांनी सातारा शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.
डॉ. सुभाष चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हळूहळू जिल्हा शासकीय रुग्णालयाची घडी बसू लागली. तोच कोरोनाने शिरकाव केला. या कोरोनाच्या काळात शासनाकडून विविध प्रकारची वैद्यकीय उपकरणे देण्यात आली. त्यामुळे उपकरणांची कमतरता भासत नव्हती. मात्र, अलीकडे जिल्हा शासकीय रुग्णालयामधून एक-एक वैद्यकीय उपकरण चोरीला जाऊ लागले असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयामधून ऑक्सिजन सिलिंडर चोरीला गेला होता. हा सिलिंडर नेमका कोणी चोरून नेला, याचा तपास रुग्णालयातील समितीकडून सुरू असतानाच, आता घसा तपासणीचे मशीन चोरीला गेले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे मशीन चक्क ऑपरेशन थिएटरमधून चोरीला गेले आहे. त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात पहिल्यांदा रुग्णालयातील कर्मचारी अडकत आहेत. ज्याला या मशीनची माहिती आहे, अशा व्यक्तीनेच हे मशीन चोरून नेले असावे, अशी शंका रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी अशा प्रकारच्या वस्तूंची जिल्हा रुग्णालयामधून चोरी झालेली नाही. मात्र, आता चोरीच्या घटना वाढत असल्याने रुग्णालय प्रशासन हतबल झाले आहे. आतापर्यंत दोन वस्तू चोरीला गेल्या आहेत. मात्र, यावर वेळीच लक्ष दिले नाही तर एक एक वस्तू करत संपूर्ण रुग्णालय एक दिवस खाली होईल, याची धास्तीही आता घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

























































