
एकमेका साह्य करू… अवघे धरू सुपंथ… हा सहकाराचा मूलमंत्र सर्व जगाला देणाऱया नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे सहकारातून रुग्णालये उभी राहिली, तशी आता ऑक्सिजन निर्मितीही सहकार तत्त्वाच्या आधारे केली जात आहे. शहरातील सहा रुग्णालयांनी एकत्रितपणे नगरच्या एमआयडीसीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन स्वयंपूर्णतेचे पाऊल टाकले आहे. त्यांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असून, ऑगस्टअखेर हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
नगर जिल्हा सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. याच धर्तीवर नगरमध्येही डॉक्टरांनी एकत्र येत रुग्णालये उभारली आहेत. विविध आजारांचे डॉक्टर एकत्र आल्याने एकाच रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांची उपचार सुविधाही करणे शक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱया लाटेला तोंड देण्यासाठी शासनाने 50 बेडवरील रुग्णालयांनाच ऑक्सिजन स्वयंपूर्णता सक्तीची केल्याने नगरमधील साईदीप हेल्थकेअर (बेड क्षमता 260), न्यूक्लिअस हॉस्पिटल (बेड क्षमता 50), श्रीदीप हॉस्पिटल (बेड क्षमता 53), स्वास्थ्य हॉस्पिटल (बेड क्षमता 62) व मॅक केअर सुपर स्पेशालिटी (बेड क्षमता 75) व प्राईम केअर मल्टिस्पेशालिटी (बेड क्षमता 50) या सहा रुग्णालयांनी एकत्र येऊन 600 सिलिंडर प्रतिदिन क्षमतेचा एएसयू ऑक्सिजन प्लाण्ट नागापूर एमआयडीसीमध्ये उभारण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. ऑगस्ट महिनाअखेरीपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
नगरच्या मनपा हद्दीत 216 रुग्णालये आहेत व सुमारे 400 क्लिनिक्स आहेत. या रुग्णालयांपैकी निवडक 16 रुग्णालयांच्या ठिकाणीच कोविड रुग्णांवर उपचार सुविधा मान्यता आहे. यापैकी सहा रुग्णालयांनी एकत्रित ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे, तर अन्य दहा रुग्णालयांनी त्यांच्या स्तरावर ऑक्सिजन निर्मितीसह गरज लागेल तेव्हा पाहिजे तेवढे सिलिंडर उपलब्धतेबाबत ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांशी करार केले आहेत. यात युनायटेड सिटी हॉस्पिटल (70 बेड), साई एशियन हॉस्पिटल (70 बेड), ऍपेक्स मल्टिस्पेशालिटी (65 बेड), इम्पल्स हॉस्पिटल (65 बेड), विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी (50 बेड), सिटी केअर हॉस्पिटल (52 बेड), आनंदऋषीजी हॉस्पिटल (280 बेड), एशियन नोबल हॉस्पिटल (160 बेड), सुरभी हॉस्पिटल (240 बेड) व बूथ हॉस्पिटल (100 बेड) या रुग्णालयांचा समावेश आहे.
कोरोना काळात ज्या दिवशी सर्वोच्च ऑक्सिजनची गरज भासली, ती गृहित धरून तिच्या तिप्पट ऑक्सिजनसाठा राखीव ठेवण्याचे बंधन 50 बेडवरील रुग्णालयांना आहे. त्यानुसार शहरातील 16 रुग्णालयांनी ऑक्सिजन प्रकल्प वा सिलेंडर उपलब्धतेबाबत कार्यवाही सुरू केली असून, त्यावर मनपाचा आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. नियमितपणे या कामांचा आढावा घेतला जात आहे.
-डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नगर मनपा.
महापालिकेची दोन स्तरावर तयारी
महापालिकेने हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा 20 केएल क्षमतेचा प्लाण्ट उभारण्याची तयारी सुरू केली असून, सावेडीच्या जुन्या कचरा डेपोच्या जागी तो उभारण्याचा कार्यारंभ आदेश ठेकेदाराला देण्यात आला आहे. 45 दिवसांत प्रकल्प उभारून 15 दिवस त्याची ट्रायल देण्याची असे मिळून दोन महिन्यांचा अवधी यासाठी देण्यात आला. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. याशिवाय शहरात मनपाच्या कोविड सेंटरमध्ये एकूण 510 बेड सुविधा असून, त्याच्या 25 टक्के म्हणजे सुमारे 125 रुग्णांसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 7 लिटर क्षमतेचे 100 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर घेतले जाणार आहे. आणखी 10 लिटर क्षमतेचे 50 कॉन्स्ट्रेटर घेऊन अशा 150 सिलिंडरची लायब्ररी मनपाद्वारे केली जाणार आहे. मनपा स्थायी समितीने नुकतीच याला मान्यताही दिली आहे.



























































