
हिंदुस्थानी ‘शटल क्वीन’ पी. व्ही. सिंधूचा जेतेपदाची दुष्काळ संपता संपत नाहीय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक पटकावणाऱया सिंधूला त्यानंतर एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. रविवारी कोरियाच्या एन. सियोंगने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनलच्या अंतिम फेरीत सिंधूचा 21-16, 21-12 असा सहज पराभव करीत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 26 वर्षीय विद्यमान विश्वविजेत्या सिंधूने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर चुरशीचा विजय मिळवत अंतिम फेरीत मजल मारली होती.
दक्षिण कोरियाच्या आन सियोंगकडून सरळ गेममधे पराभूत झाल्यामुळे बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्समध्ये सिंधूला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. विद्यमान विश्वविजेत्या सिंधूकडे जागतिक सहाव्या मानांकित सियांगच्या तुफानी खेळाचे उत्तरच नव्हते. सियोंगने जबर आक्रमक खेळ करीत सिंधूला लढतीत डोकेच वर काढू दिले नाही. 39 मिनिटांच्या झुंजीतच सियोंगने डबल ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूला दोन गेममधे सहज पराभूत केले. इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावणारी सियोंग आज तुफानी लयीत खेळली.
टोकियो ऑलिम्पिकपासून सिंधू जेतेपदाविना
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक पटकावणाऱया सिंधूला त्यानंतर आजपावेतो मोठे विजेतेपद पटकावता आलेले नाही. ती फ्रेंच ओपन, इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया ओपन या स्पर्धांच्या उपांत्य फेरीपर्यंतच पोहचू शकली. स्विस ओपनच्या फायनलमध्येही तिला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आज बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनलमध्ये सिंधू पुन्हा अपयशी ठरली आहे. 2018 मध्ये सिंधूने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत तीनदा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम करणारी सिंधू पहिली हिंदुस्थानी महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.


























































