नगरदेवळा येथे पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळपोळीचा प्रयत्न केल्याची घटना आज पहाटे घडली. सुदैवाने घरातील महिलांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

नगरदेवळा येथील रहिवासी किरण उमेश राऊळ हे रात्री आपल्या घरी असताना ही घटना घडली. एका विना नंबरच्या मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम तेथे आले. त्यांचे वय अंदाजे 30 ते 40 वर्षे असून शरीराने मजबूत असलेल्या या दोघांनीही ओळख पटू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधले होते. या हल्लेखोरांनी किरण राऊळ यांच्या घराच्या लाकडी दरवाजावर सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल ओतले आणि आग लावून दिली.

दरवाजाजवळील पडद्याने तात्काळ पेट घेतल्याने घरात धूर पसरला. त्याचवेळी नंदकौर राऊळ यांना पेट्रोलचा तीव्र वास आणि उष्णतेची जाणीव झाली. त्यांनी तत्काळ आपली मुलगी किरण राऊळ यांना उठवले. सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय होता. मात्र दरवाज्याजवळ लागलेली आग पाहताच त्यांनी धाडस दाखवत पाण्याच्या साहाय्याने आग विझवली.आग विझवल्यानंतर बाहेर पाहणी केली असता पेट्रोलची रिकामी बिलसरी बाटली, माचिस पेटी आणि जळालेली आगकाडी आढळून आली. त्यामुळे हा प्रकार अपघाती नसून जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.