पाचोरा पीपल्स बँक भक्कम: आमदार किशोर पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाचोरा 

चेअरमन व संचालकांच्या आप- आपसातील मतभेदातुन पाचोरा पीपल्स बँकच्या आठ संचालकांनी अचानकपणे सामुहीक राजीनामे दिले आहेत. तसेच बँकेवर प्रशासक बसले आहे. परंतु या प्रकारामुळे बँकेशी आर्थिक व्यवहार करणार्‍यांना कोणताही त्रास होणार नाही. बँक आपली आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी ग्वाही  शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि पाचोरा पिपल्स बँकेच्या 8 संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे जनतेच्या मनात येणार्‍या शंकांचे निरसन करण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, अ‍ॅड. दिनकर देवरे, स्विय सहायक राजु पाटील, व्यापारी प्रशांत अग्रवाल उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर पाटील म्हणाले की, “या घटनेची पूर्वकल्पना मला असती, तर मी ही घटना घडू दिली नसती. तब्बल 50 वर्ष जुनी असलेल्या या बँकेत 145 कोटी ठेवी आहेत. 125 कोटी कर्जवाटप, 24 कोटी स्वनिधी, 6 कोटी 38 लाख भागभांडवल, 50 कोटी रुपये शासकीय व इतर बँकांमध्ये अमानत तर 190 कोटी खेळते भागभांडवल आहे. अशा भक्कम आर्थिक पाया असलेल्या बँकेच्या आर्थिक व्यवहारावर या घटनेचा कोणताही परिणाम होणार नाही. यासोबतच 250 कर्मचार्‍यांचे कुंटुब या बँकेवर अवलंबून आहेत. गेल्या 3 दिवसात बँकेतुन काही जणांनी ठेवी काढल्याच्या अफवांना ऊत येत आहेत. मात्र, बँकेच्या आर्थिक हितासाठी मतभेद विसरून एकजुटाने सामोरे जावे लागणार आहे. जशी आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे, तशीच व्यापारी व कर्मचार्‍यांचीही आहे” असेही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले.