पाचवड–चिपळूण रस्त्याचे चौपदरीकरण ‘धुळीत’, गावकऱ्यांचा श्वास रोखला; ठेकेदारांचा बेजबाबदार कारभार

जावळी तालुका—पाचवड ते मेढामार्गे चिपळूण या महत्त्वाच्या महामार्गावर सध्या युद्धपातळीवर चौपदरीकरणाचे काम सुरू असले, तरी या कामामुळे रस्त्यालगतच्या गावकऱयांचे हाल प्राणांतिक झाले आहेत. ठेकेदारांकडून काम करताना नियमानुसार पाण्याची फवारणी न केल्याने धुळीचे प्रचंड प्रमाण निर्माण झाले असून, परिसरातील नागरिक, शेतकरी आणि वाहनचालक गंभीर आजारांच्या विळख्यात सापडत आहेत.

रोज हजारो वाहनांची वहिवाट असलेल्या या रस्त्यावर दररोज धुळीचे जाड थर उडतात. नाक, तोंड, डोळे आणि श्वसनमार्गात धूळ जाऊन खोकला, दमा, ऍलर्जी आणि त्वचारोग वाढत असल्याच्या तक्रारी सतत येत आहेत. रस्त्यावर काम सुरू असताना, सकाळ–संध्याकाळ पाणी मारणे बंधनकारक असतानाही, ठेकेदार हा नियम पायदळी तुडवत असल्याचा आरोप केला जात आहे.

नागरिकांनी अनेकवेळा ठेकेदारांच्या कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप गावकऱयांनी केला आहे. ठेकेदारांची स्थानिक यंत्रणा थातूरमातूर पाण्याचे टँकर फिरवण्याचा दिखावा करते; पण प्रत्यक्षात रस्त्यावर पाणी पोहोचतच नाही. यामुळे गावकरी, छोटे व्यावसायिक, दुकानदार आणि दिवसभर या मार्गावरून वाहतूक करणारे वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

रस्ता विकास नागरिकांच्या भल्यासाठी होत असला, तरी काम करताना पाळायचे मूलभूत सुरक्षा नियम पूर्णपणे धाब्यावर बसवल्याची परिस्थिती आहे. धुळीच्या प्रादुर्भावामुळे आसपासची शेती, फळबागा आणि जनावरांनाही मोठय़ा प्रमाणात फटका बसत आहे. शासकीय यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ठेकेदार अक्षरशः मनमानी कारभार करत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.

… तर आंदोलन उभारणार

जर पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर लोकांनाच रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या गंभीर आरोग्य संकटाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नियमित पाणी फवारा

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे प्राण धोक्यात आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्यावर नियमित पाणी फवारणी, धूळ नियंत्रण यंत्रणा राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.