
सामना प्रतिनिधी । इगतपुरी
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील मुख्य समजल्या जाणाऱ्या भातपिकाला सालाबादप्रमाणे याही वर्षी अस्मानी – सुलतानी अशा दोन्ही संकटांनी ग्रासले आहे. ऐन सोंगणीचा मोसम जवळ आला असताना गरी वाणाचे भात पीक निसवलेच नसल्याने व पावसानेही लवकरच दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच हळी वाणाच्या भातालाही निसवल्यानंतर पाण्याचा तुटवडा भासल्याने यंदा भाताच्या उत्पन्नात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात आता बऱ्याच ठिकाणी भातपिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बिघडलेले वातावरण, कमी-जास्त पर्जन्य, करपा, लाल – पांढरा टाका, मावा आदींसारखे रोग, बियांणामध्ये भेसळ यामुळे भाताच्या उत्पन्नात घट येत असून आधीच बेजार झालेला शेतकरी यंदा पर्जन्यमानात झालेल्या कमालीच्या घटीमुळे मेटाकुटीला आला आहे. सोंगनीयोग्य झालेला हळी वाणाचा भात पाण्याच्या कमतरतेमुळे हातुन गेला आहे. त्यातच बहुतांश गरी वाणाच्या भाताला निसवण्यास अद्यापही उशीर असून उन्हाचा चटका वाढला आहे. पाऊस तर नाहीच त्यातच महावीतरणने भारनियमनात 4 तासांची वाढ केल्याने पिकांना पाणी देण्यासाठी वीजही वेळेत उपलब्ध होत नसल्याने भात पीक वाचवायचे तरी कसे? असा प्रश्न असतानाच बऱ्याच ठिकाणी भातपिकावर करप्याचा प्रादुर्भाव वाढायला लागल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.
पूर्व भागातील धामणगावसह शिवारातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले असले तरी पावसाने दडी दिल्याने नुकसान झालेल्या व निसवायचे बाकी असलेल्या भात पिकांचे पुढे काय? करप्याने बाधित भातपिकांचे पंचनामेसुद्धा अद्याप केले नसून लोकप्रतिनिधीही यावर लक्ष द्यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महागडी बियाणे, खते, मनुष्यबळ आदीबाबींची पूर्तता करूनही हातातोंडाशी आलेला घास अस्मानी-सुलतानी संकटामुळे हिरावला जात आहे.




























































