‘पद्मश्री’ डॉ. सुबन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू

2022 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळालेले डॉ. सुबन्ना अय्यप्पन (70) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. शनिवारी श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. कर्नाटक पोलिसांनी अय्यपन यांच्या गूढ परिस्थितीत मृत्यूचा तपास सुरू केला आहे. अय्यप्पन हे कृषी आणि मत्स्यव्यवसाय शास्त्रज्ञ आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) अध्यक्ष असलेले पहिले बिगर-पीक शास्त्रज्ञ होते.

कर्नाटक पोलिसांनी माहिती दिली की, नदीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती जनतेकडून मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यांची दुचाकी नदीकाठी आढळली आणि अयप्पन यांनी नदीत उडी मारली असावी असा संशय आहे. अय्यपन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवाल येणे बाकी आहे. अय्यप्पन हे म्हैसूरचे रहिवासी असून, त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. कुटुंबाने सांगितले की, अय्यप्पन 7 मेपासून बेपत्ता झाल्यानंतर 8 मे रोजी म्हैसूरच्या पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, आयसीएआरचे माजी सदस्य वेणुगोपाल बदरवाडा यांनी अयप्पन यांच्या मृत्यूची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.