
वाराणसी संगीताचे गौरव असलेले शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दीर्घ आजारानंतर छन्नूलाल मिश्रा यांचे (गुरुवारी २ ऑक्टोबर) पहाटे ४ वाजून १७ मिनीटांनी मिर्झापूर येथे निधन झाले. ते सेप्टिसिमिया या आजाराशी झुंजत होते. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी त्यांना स्ट्रोक आला होता. त्यांना सुरुवातीला वाराणसीतील बीएचयू रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांना असे आढळून आले की छन्नूलाल मिश्रा यांना छातीत संसर्ग झाला होता आणि ते अशक्तपणानेही ग्रस्त होते. त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पंडित छन्नूलाल मिश्रा यांचा जन्म ३ ऑगस्ट १९३६ रोजी आझमगड येथे झाला. त्यांनी वाराणसीला त्यांचे कार्यस्थळ म्हणून निवडले. २०२० मध्ये छन्नूलाल मिश्रा यांना पद्मविभूषण, २०१० मध्ये पद्मभूषण आणि २००० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात २०१० मध्ये त्यांना यश भारती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
छन्नूलाल मिश्रा हे ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनमधील एक उच्च दर्जाचे कलाकार होते. पंडित छन्नूलाल मिश्रा हे सांस्कृतिक मंत्रालयाचे (उत्तर-मध्य सरकार) सदस्य देखील होते. कुटुंबातील सूत्रांनुसार, पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे अंतिम संस्कार वाराणसी येथे केले जातील. पद्मविभूषण छन्नूलाल मिश्रा हे एक दिग्गज कलाकार होते ज्यांनी ठुमरी, दादरा, चैती आणि भजन या गायनाने आपल्या देशाला समृद्ध केले. छन्नुलाल मिश्रा यांनी त्यांच्या अनोख्या शैलीने शास्त्रीय संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.