
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे,[email protected]
पंडवानी लोकगायिका तीजनबाई… गायनाचा हा अनोखा ढंग पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झाला आहे.
पद्मभूषण तीजनबाईंच्या आयुष्यातील तो दिवस अविस्मरणीय होता. दिल्लीवरून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱयाचा फोन आला आणि तीजनबाईंना पद्मविभूषण हा भारतरत्ननंतरचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाल्याचे त्या अधिकाऱयाने सांगितले. ऐकायला कमी येत असल्याने तीजनबाईंना नेमके कळेना की, काय झाले आहे? त्यांचा स्वीय सहायक मनहरण सारवा यांनी सांगितले, ‘‘अम्मा, आप मन ल एक ठन अऊ सम्मान मिलनेवाला है, अभी खबर मिली से?’’ तीजनबाई म्हणाल्या, ‘‘काए सम्मा मिलही’’. मनहरण म्हणाले, ‘‘देश के दूसरा सबले बडे पुरस्कार हरे। पद्मविभूषण पुरस्कार कहिथे ऐला।’’ पुढे तीजनबाई म्हणाल्या, ‘‘ऐ काए पुरस्कार हरे। मै तो नही जानो एकर बारे में। मोला लगिस कि कोई देने वाला हो ही। अभिचे तो जापान ले पुरस्कार लाए रेहेन।’’
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होण्याआधी अलीकडेच त्या जपानला जाऊन आल्या होत्या. तिथे त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तीजनबाईंशी बातचीत करण्याचा योग आला. कारण 1986 पासून तीजनबाईंशी स्नेहबंध जुळलेले आहेत. तीजनबाई हिंदुस्थानच्या लोकगायन परंपरेतील एक मिथक आहे. छत्तीसगढच्या पारधी समाजातील तीजनबाई या कलाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मानापर्यंत पोहोचल्या ती चित्रपटाला लाजवील अशीच चित्तरकथा आहे.
तीजनबाई छत्तीसगढच्या गनियारी येथील. त्यांचे वडील हुनूकलाल परधा आणि आई सुखवती यांच्या पोटी 24 एप्रिल 1956 साली तीजनबाईंचा जन्म झाला. बालपणातच आपले आजोबा ब्रजलाल यांच्याकडून महाभारतातील कथा तीजनबाईंनी ऐकल्या आणि या कथा त्या मुखोद्गत करू लागल्या. त्यानंतर उमेदसिंह देशमुख यांनी तीजनबाईंची प्रतिभा आणि स्मरणशक्ती पाहून त्यांना अनौपचारिक प्रशिक्षण दिले. वयाच्या 13व्या वर्षी तीजनबाईंनी पंडवानी हा लोकगायन प्रकार सादर केला. जेमतेम चौथीपर्यंतचे शिक्षण झालेल्या तीजनबाईंना चार विद्यापीठांनी डिलीट ही सन्माननीय पदवी बहाल केलेली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगकर्मी हबीब तन्वीर यांनी तीजनबाईंचे पंडवानी गायन ऐकले आणि तीजनबाईंचे जीवनच बदलले. तीजनबाई दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूरतर्फे पंडवानी सादर करत असत. मी त्यांच्या पंडवानी गायनाने प्रभावित झालो आणि द्रौपदी वस्त्रहरण, सुभद्राहरण, घटत्कोच वध अशा कथांच्या ध्वनिमुद्रिका तीजनबाईंच्या पंडवानी शैलीत त्या काळी प्रसिद्ध केल्या.
एका कार्यक्रमात पद्मविभूषण पंडित जसराज आणि तीजनबाई हे दोघेही प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यावेळी द्रौपदी वस्त्रहरण कथा तीजनबाईंनी सादर केली आणि जसराज यांच्या डोळय़ांत अश्रू तरळले ते तीजनबाईंना उद्गारले, ‘‘बेहेनजी, रोंगटे खडे हो गये। महाभारत की यह लोकगाथा मेरे कला जीवन में मैने कभी सुनी नहीं।’’ पद्मविभूषण प्राप्त झाल्यानंतर तीजनबाईंशी भ्रमणध्वनीवरून अभिनंदन करण्याचा योग आला. त्या म्हणाल्या, ‘‘खांडगे सर, मैं द्रौपदी चीरहरण करते करते बुढी हो गई, आप वो सुनते सुनते बुढे हो गये। महाभारत की कहानियां अपनी सभ्यता और संस्कृती की पहचान है। आखरी सांस तक मै पंडवानी गायन करती रहूंगी।’’
केवळ छत्तीसगढ नव्हे, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोककलावंतांची शीर्षस्थ लोकगायिका म्हणून तीजनबाईंकडे पाहिले जाते. हिंदुस्थानी लोकसंस्कृतीचा आणि लोककलांचा गौरव म्हणजे तीजनबाई!

























































