Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं चीन कनेक्शन! बंदी असलेल्या चिनी सॅटेलाइट फोनचा वापर

कश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA)ने हाती घेतला आहे. हल्ल्यादरम्यान हुआवेई सॅटेलाइट फोन पहलगाम परिसरात वापरल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे. हुआवेई ही एक चिनी कंपनी असून यावर हिंदुस्थानात बंदी आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अलीकडेच कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास हाती घेतला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा यंत्रणांना हल्ल्याच्या वेळी पहलगाम भागात बंदी घातलेला हुआवेई सॅटेलाईट फोन वापरल्याचा एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे, असे सूत्रांनी ईटीला सांगितले. हुआवेई ही एक चिनी कंपनी आहे जिच्यावर हिंदुस्थानात बंदी आहे. यामुळे हा फोन पाकिस्तान किंवा इतर परदेशातून तस्करी करण्यात आल्याचा संशय आहे.

चिनी दूरसंचार विक्रेते हुआवेई आणि झेडटीई हे हिंदुस्थान सरकारने ठरवलेल्या विश्वसनीय स्रोताच्या अटी पूर्ण करत नाहीत. यामुळे हुआवेई आणि झेडटीई यांना हिंदुस्थानात 5जी नेटवर्कची उत्पादने विकण्यास बंदी आहे. याबाबत कोणतीही स्पष्ट बंदी नसली तरी, हिंदुस्थानच्या दूरसंचार कंपन्यांनी चीनच्या हुआवेई आणि झेडटीईला त्यांच्या 5जी रोलआउटमधून प्रभावीपणे बंद केले आहे.

अमेरिका आणि युरोपमध्येही चिनी हुआवेईवर बंदी

अमेरिका आणि युरोपमध्येही चिनी हुआवेईवर बंदी आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांनी जुलै 2022 मध्ये पत्रकार परिषदेत चीनला इशारा दिला होता. FBI आणि MI5 च्या प्रमुखांनी चीन हा आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचा आरोप केला होता. चीनने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. कॅनडासह अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनीही हुआवेईला त्यांच्या 5G नेटवर्कमध्ये बंदी घातली आहे.