पैशांचा पाऊस भाग ४२ :- गुंतवणुकीचे तीन फॅक्टर

share-market

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

गुंतवणूकीचे एकूण तीन फॅक्टर असतात. त्या तीन घटकांचा सारासार विचार करुन गुंतवणूक केल्यास योग्य आर्थिक यश मिळवता येते. हे तीन प्रकार खालील प्रमाणे आहेत.

सुरक्षा (Security) – आपण गुंतवलेला पैसा किती सुरक्षित आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. ठराविक वेळी लागणारी ठराविक रक्कम मिळवण्यासाठी सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय निवडला जातो. उदा. मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे हे ठराविक कालावधीतच लागतात. त्यासाठी थांबता येणे शक्य नसते. अशा कारणासाठी सुरक्षित गुंतवणूक अतिशय महत्त्वाची ठरते. यामध्ये बँकामधील फिक्स डिपॉझिटस ( मुदत ठेवी) , पोस्टातील गुंतवणूक, जीवन विम्यातील आजीवन पॉलिसी या गोष्टीत गुंतवलेली रक्कम कधीही कमी होत नाही. एखाद्या व्यक्तीने एखाद्या ठिकाणी 100 रुपये गुंतवल्यास त्याचे मूल्य कधीही 100 पेक्षा कमी होत नसल्यास त्याला सर्वाधिक सुरक्षित रक्कम म्हणतात. सोने, शेअर बाजारातील गुंतवणूक यासारख्या गोष्टीमध्ये आपण गुंतवलेल्या रकमेची किंमत कमी सुध्दा होऊ शकते. यामुळे आपण गुंतवलेली पूर्ण रक्कम सुरक्षित असतेच असे नाही.

तरलता (liquidity) – एखाद्या गुंतवणूकीचे रुपांतर परत मूळ स्वरुपात किंवा रोख रकमेत करता येण्याचा कालावधी जितका कमी तितकी त्या गुंतवणूकीची तरलता जास्त असते. अटीतटीच्या प्रसंगी, अपघातसमयी, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर (emergency condition) मात करण्यासाठी तरलता हा घटक महत्त्वाचा ठरतो. उदा. सोन्यात केलेली गुंतवणूक सर्वाधिक तरल आहे. सोने लगेच विकता येते. किंवा काही मिनिटात त्याच्यावर कर्ज मिळते. त्यामुळे त्याचे रोख रकमेत रुपांतर करणे सोपे असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना सुद्धा सुरक्षा, तरलता, व परतावा या तीन घटकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. याउलट फ्लॅट किंवा घर सर्वात कमी तरलता असणारी गुंतवणूक आहे. फ्लॅट विकून त्याचे रोख रकमेत रुपांतर करण्यासाठी काही महिने किंवा आठवड्यांचा कालावधी आवश्यक असतो.

परतावा (returns) – गुंतवलेल्या रकमेतून जितका जास्त लाभ मिळेल तितका त्या रकमेचा परतावा जास्त असतो. त्याचप्रमाणे गुंतवलेल्या रकमेतून जितका कमी लाभ मिळेल तितका त्या रकमेचा कमी परतावा असतो. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, एसआयपी व व्यवसायातील गुंतवणूकीत परतावा उच्च दराने मिळवता येतो. नेहमीच्या गुंतवणूकीतून जर 6-8 टक्के परतावा मिळत असेल. तर या साधनामधून मिळणारा परतावा हा 12-45 टक्के इतका जास्त असू शकतो. अर्थात कोणत्याही एकाच गुंतवणूकीत सुरक्षा, तरलता व परतावा या तीनही गोष्टी एकत्रितपणे मिळू शकत नाहीत. समजा एखाद्या गुंतवणूकीत सुरक्षा जास्त असेल तर तरलता व परतावा कमी असू शकतो. याउलट एखाद्या गुंतवणूकीत. तरलता व सुरक्षा कमी असेल तर परतावा चांगला मिळू शकतो. या तीन घटकांना जोडून अजून एक घटक येतो. तो म्हणजे जोखीम (risk). जोखीम जितकी जास्त तितका परतावा जास्त व जोखीम जितकी कमी तितका परतावा कमी. याउलट सुरक्षा जेवढी जास्त तेवढा परतावा कमी व सुरक्षा जेवढी कमी तेवढा परतावा जास्त असू शकतो. तरलता व परतावा यांचा सुध्दा थेट संबंध असतो.

आपण शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती या प्रकारातील पहिल्या व दुसऱ्या लेखात आपल्या गरजा, उद्देश, त्यासाठी आपल्या हातात असणारा कालावधी व लागणारी रक्कम या गोष्टीचा एक तक्ता बनवला होता. त्यानुसार आपापल्या गरजेनुसार सुरक्षा, परतावा व तरलता (safety, returns & liquidity) या घटकांचा योग्य मेळ घालून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.

summary- paishancha paus part 42 by mahesh chavan

आपली प्रतिक्रिया द्या