Paithan news – पित्याचा खून करून मृतदेह मुलाने घरातच पुरला

पैठण तालुक्यातील कडेठाण येथे मन सुन्न करणारी घटना घडली. पित्याचा खून करून पोटच्या मुलानेच मृतदेह घरातच पुरून टाकला. आठवडा उलटून गेल्यावर दुर्गंधी पसरली अन् हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पैठण महसूल व वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खड्यातून मृतदेह बाहेर काढला.

मयताचे नाव कल्याण बापूराव काळे (६५) असे असून आरोपी मुलगा रामेश्वर कल्याण काळे (३८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पैठण तालुक्यातील कडेठाण येथील कल्याण बाबुराव काळे यांचा ८ दिवसांपूर्वी मुलगा रामेश्वर कल्याण काळे याच्याशी वाद झाला होता. यानंतर त्याने बापाचा खून केला. बाप मयत झाल्याचे लक्षात येताच मृतदेह ८ दिवसापूर्वीच घरामध्ये खड्डा करून पुरून टाकला होता. घरात दुर्गंधी सुटू लागली. त्यात दिवसेंदिवस वाढ होत गेली. दरम्यान मयताच्या पत्नीने आपल्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर या गुन्ह्याला वाचा फुटली.