
पाथर्डी तालुक्यातून अनेक भाविक पंढरपूरला जात असतानाही पाथर्डी आगाराने पाथर्डी पंढरपूर ही बसगाडी बंद केली होती. ही गाडी पुन्हा सुरू करावी, अशी भाविकांची मागणी होती. मात्र तरीही ही बससेवा सुरु न झाल्याने अखेर पैठण आगाराने पैठण ते पाथर्डीमार्गे पंढरपूर अशी बससेवा सुरु केल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ही बस पाथर्डी आगारात आल्यानंतर या बसचे चालक प्रदीप कदम व वाहक रामेश्वर थोरात यांचे भाविकांनी स्वागत केले. ही बस पैठण येथून सकाळी साडेसहा ला निघते व शेवगावमार्गे पाथर्डी आगारात पावणेआठ वाजता येते. त्या नंतर कडा, मिरजगाव, करमाळामार्गे पंढरपूरला जाऊन तेथून दुपारी सव्वा वाजता परत निघते. तालुक्यात वारकऱ्यांची संख्या लक्षणीय असून पैठण आगाराने ही बससेवा सुरु केल्याने भाविकांमधून या बसचे स्वागत होत असून या बससेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.