मासे खाणाऱ्यांची पावसाळ्यातली चिंता मिटणार! पाजपंढरीत ताजी मासळी सुकविण्याची लगबग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Relief for Fish Lovers Dried Fish Stocking Starts in Pajpandhari for Monsoon Saamana

पावसाळयात मासेमारी बंद असते. त्यावेळी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याचे काम ताज्या मासळीऐवजी सुकी मासळी करते. सध्या पाजपंढरीत ताजी मासळी सुकविण्याच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे.

रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालूक्यातील पाजपंढरी हे गाव मासेमारी करणाऱ्या जमातीचे सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. पाजपंढरीत सर्वाधिक मच्छिमार कोळी बांधवांची वस्ती आहे. अशा या पाजपंढरी गावातील मासेमारी रहिवाशी जमातींचे मासेमारी हेच मुख्य अर्थाजनाचे साधन आहे. मच्छिमार कोळी समाजाला अन्य दुसरे अर्थप्राप्तीसाठीचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात मासेमारी व्यवसाय बंद असतो तेव्हा पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी ताज्या मासळीऐवजी सुक्या मासळीचा व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय करण्यासाठी कोळी भगीनी या आधीच उन्हाळयात मासळी सुकवून ठेवतात.

समुद्राच्या किनाऱ्यावर जिथे जागा मिळेल तेथे बांबू पुरून त्यावर आडवी काठी ठेवून त्यावर खवय्ये शौकीनांना खाण्यासाठी सध्या ताज्या बग्या स्वच्छ वाळवण्याचे काम करत आहेत. मासे वाळविण्यासाठी बांधण्यात आलेल्या मच्छि ओट्यांवर मासे सुकविण्यात येत आहेत. लोकांना स्वच्छ सुकी मासळी मिळावी म्हणून राखणही करावी लागत आहे. मासळीच्या सुरक्षिततेसाठी वर जाळेही टाकण्यात येते.

असे होते मासळी वाळविण्याचे काम

हे मासळी वाळविणे हे काही एका दिवसाचे काम नसते किंवा कुठेही मासळी सुकत घातली असे होत नाही तर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पूर्णपणे त्याची खबरदारी घ्यावी लागते. अर्थात त्यामुळे लागणारा वेळ आणि मनुष्यबळ याचा विचार करता साहजिकच सुक्या मासळीच्या दरातसुध्दा भाववाढ होत असते किंवा ती करावी लागते. मात्र दर वाढले की बोंबा मारणा-याचीही कमी नसते मात्र यामागे मच्छी व्यवसायिकांनी उपसलेले कष्ट आणि घेतलेली मेहनत कोणीही विचारत घेत नाहीत.