पाकिस्तानात कुख्यात गुंड टिपूची हत्या, लग्नाला आलेला असताना घातल्या गोळ्या

पाकिस्तानातील लाहोरमधून मोठी बातमी समोर आली आहे. लाहोरचा अंडरवर्ल्ड डॉन आणि कुख्यात गुंड अमीर बालाज टिपूची हत्या करण्यात आली आहे. अमीर बालाज टिपू एका लग्न समारंभात गेला होता. यावेळी एका अज्ञाताने बालाज टिपूवर गोळ्या झाडल्या आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकारामुळे लग्नसमारंभात खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाज 18 फेब्रुवारी रोजी रविवारी एका लग्न समारंभात सहभागी झाला होता. तिथे अचानक एका अज्ञात हल्लेखोराने अमीर आणि त्याच्या दोन साथीदारांवर गोळीबार केला, त्यातच ते जखमी झाले. त्यानंतर अमीरला वाचवण्यासाठी त्याच्या अंगरक्षकाने हल्लेखोराला ठार केले. बालाजची प्रकृती फारच गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बालाजच्या हत्त्येमुळे त्याच्या समर्थकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकाराची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसर सील केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.  सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

कुख्यात गुंड अमीर बालाज टिपू हे आरिफ अमीर उर्फ ​​टिपू ट्रकनवाला यांचा मुलगा होता. 2010 मध्ये इकबाल विमानतळावर झालेस्या प्राणघातक हल्ल्यात आरिफचा मृत्यू झाला होता. तसेच अमीरच्या आजोबांची देखील जुन्या वैमानस्यातून हत्या करण्याच आली होती. अमीर, त्याचे वडिल आणि आजोबा हे तिघेही अंडरवर्ल्डचे डॉन होते.