
सामना ऑनलाईन। लाहोर
चीन पाकिस्तानवर मदतीचा वर्षाव करत असल्याच्या नेहमीच चर्चा होत असतात. पण सध्या या दोन्ही देशांबद्दल वेगळीच चर्चा कानावर येत आहे. चीनला खुश करण्यासाठी पाकिस्तानने गाढवांची पैदास वाढवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गाढवांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तानने चीन व इथोपियाला मागे टाकले आहे. चीनमध्ये गाढवाच्या कातडी व मांसाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामुळे चीनला जास्तीत जास्त गाढवे मिळावीत यासाठी पाकड्यांनी हा खटाटोप सुरू केल्याचे बोलले जात आहे.
यावर्षी पाकिस्तानच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देशातील गाढवांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या एप्रिल महिन्याच्या सर्वेक्षणानुसार 2017-18 मध्ये गाढवांच्या संख्येत १ लाखाने वाढ झाली आहे. त्यानुसार 2017-18 मध्ये हा आकडा 53 लाखावर पोहोचला आहे. त्याआधी 2015-16 साली गाढवांची संख्या 51 लाख होती. तर 2016-17 मध्ये हा आकडा 52 लाखावर पोहोचला आहे.
चीनमध्ये पाकिस्तानी गाढवांना विशेष मागणी आहे. चीनमध्ये गाढवांची कातडी व मांस फार उपयोगी असल्याचे मानले जाते. गाढवाच्या कातडीपासून जिलेटीन बनवण्यात येते. ज्याला इजीयो असे म्हटले जाते. शरीरात रक्ताभिसरण सुरळीत व्हावे यासाठी पूर्वी चीनी औषधांमध्ये गाढवाच्या रक्ताचा वापर केला जायचा. तेव्हापासूनच पाकिस्तानी गाढवांना चीनमध्ये मागणी आहे.






























































