पुतीन यांच्या दौऱयामुळे पाकिस्तानची झोप उडाली; इम्रान खान यांच्या कूटनीतीला जबर धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हिंदुस्थान दौऱयामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. रशिया-हिंदुस्थानची जवळीक वाढते की काय, या भीतीतून पाकिस्तानने पुतीन यांच्या दौऱयावर बारीक लक्ष ठेवले आहे. इम्रान खान यांनी गेले काही महिने पाकिस्तान आणि रशियाचे संबंध दृढ करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यानंतरही पुतीन यांनी पाकिस्तानची पर्वा न करता हिंदुस्थानशी संबंध ठेवल्याने इम्रान यांच्या कूटनीतीला जबरदस्त धक्का बसला आहे.

पुतीन हे 21 व्या हिंदुस्थान-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी सोमवारी दिल्लीत दाखल झाले. अलीकडच्या काळात हिंदुस्थानचे चीन आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांच्या सीमांवर तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या दौऱयाने पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हिंदुस्थान आणि रशियाचे संबंध कलूषित करण्यासाठी गेले काही महिने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कसोशीने प्रयत्न केले. अफगाणिस्तानच्या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांनी रशियाशी जवळीकता वाढवली. चार महिन्यांत पुतीन यांच्याशी तीनदा चर्चा केली. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानी सैन्याने रशियन सैन्यासोबत संयुक्त सरावही केला. गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्यास दोन्ही देश राजी झाले. यातून इम्रान यांच्या कूटनीतीला यश मिळतेय, असे वाटत असतानाच पुतीन यांनी हिंदुस्थानात येऊन इम्रान यांना मोठा धक्का दिला.

…म्हणून रशियाने पाकिस्तानला जवळ केले!

हिंदुस्थानसोबतच्या संबंधांबाबत रशियाने सुरुवातीपासूनच पाकिस्तानला टाळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 2009 नंतर रशियाने पाकिस्तानला जवळ केले. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाल्यामुळे रशिया अस्वस्थ झाला. याच अस्वस्थतेतून रशियाने पाकिस्तानशी संबंध मजबूत करण्यास सुरुवात केली. पुढे हिंदुस्थानच्या विरोधाला न जुमानता रशियन सैन्याने पाकिस्तानसोबत संयुक्त युद्धाभ्यासही केला.

चीनही टेन्शनमध्ये

पुतीन यांच्या दौऱयाने चीनही टेन्शनमध्ये आला आहे. हिंदुस्थान रशियाकडून सुपर अॅडव्हान्ड मिसाईल डिफेन्स सिस्टम एस-500 किंवा एस-500 एसएएमची खरेदी करू शकतो. ही सिस्टम एस-400 मिसाईल डिफेन्सपेक्षाही प्रचंड धोकादायक आहे. सीमेवरील वाढत्या तणावाच्या परिस्थितीत हिंदुस्थान रशियाकडून ही सिस्टम खरेदी करून आपली लष्करी ताकद आणखी भक्कम करेल या भीतीने चीन प्रचंड हैराण झाला आहे.