पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला, 15 नागरिकांचा मृत्यू; लष्कर प्रमुखांचे वायूदलाला अलर्ट राहण्याचे आदेश

3040

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर भ्याड हल्ला केला असून सीमाभागात केलेल्या रॉकेट हल्ल्यात 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रॉकेट हल्ला आणि पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात 80 हुन नागरिक जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला अफगाणिस्तान जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असून लष्कर प्रमुख यासिन झिया तातडीने हाय लेव्हल बैठक घेत एअरफोर्सला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.

‘द इकॉनॉमिक्स टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, बंद चमन-स्पिन बोल्डक सीमेवर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सैन्यात झडप झाली. यावेळी ईदसाठी दोन्ही बाजूने शुभेच्छा देणाऱ्या नागरिकांनी गर्दी केली होती. याच दरम्यान पाकिस्तानने रॉकेट हल्ला केल्याने 15 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले.

पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने तीव्र शब्दात निषेध केला असून पाकिस्तानकडून अफगाण भागात रॉकेट हल्ला सुरू ठेवल्यास आम्ही याचा सामना करण्यास सक्षम असल्याचे खडसावले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने व सैन्याने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र परराष्ट्र मंत्री शाह अहमद कुरेशी यांनी हा वाद सोडवण्यात येईल असे म्हटले आहे.

अफगाणिस्तानची न्यूज एजन्सी ‘टोलोन्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने स्पिन बोल्डक जिल्ह्यातील गर्दीच्या भागात रॉकेट हल्ला केला. यामुळे अफगाणिस्तान भडकला असून लष्कर प्रमुख यासिन झिया यांनी वायुदल आणि अन्य सैन्य दलांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना कंधार मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या