पाकिस्तानी खेळाडू देणार मसूद अझहरला मॅच फी! दहशतवाद्यांवर पैशांची खैरात!! जय शहा आणि कंपनीसाठी सीमेपलीकडून पैगाम

हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांतून मिळणारा पैसा दहशतवादासाठीच वापरला जाणार, ही भीती अखेर खरी ठरली. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानशी क्रिकेटचा हट्ट करणारे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा आणि कंपनीसाठी सीमेपलीकडून तसा ‘पैगाम’च आला आहे. आशिया कपच्या फायनल सामन्याचे संपूर्ण मानधन दहशतवादी मसूद अझहरला देण्याचे पाकिस्तानी टीमने जाहीर केले आहे. मसूदबरोबरच अन्य दहशतवाद्यांवरही पैशाची खैरात करण्यात आली आहे.

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवली होती. त्यात हिंदुस्थानी संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहरच्या कुटुंबीयांसह काही दहशतवादी मारले गेले होते. त्या मसूदला पाकिस्तानी संघ आर्थिक ताकद देणार आहे. पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान अली आगा याने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

मसूदचे 10 कुटुंबीय झाले होते ठार

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या 10 नातलगांचा मृत्यू झाला होता. त्यात त्याची बहीण, भावोजी, पुतण्या, त्याची पत्नी, पुतणी व पाच मुलांचा समावेश होता. पाकिस्तानी क्रिकेट संघाने जाहीर केलेली आर्थिक मदत या सगळ्यांचा नातलग म्हणून मसूद अजहर याला मिळेल असे बोलले जात आहे.

पीसीबीचेही ट्विट

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही एक ट्विट केले आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाने आशिया कपमधील फायनल सामन्याचे संपूर्ण मानधन 7 मेच्या हल्ल्यातील शहिदांना देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या सहवेदना शहिदांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे पीसीबीने म्हटले आहे.

मोदींच्या ट्विटला पीसीबीच्या प्रमुखाचे उत्तर

आशिया कपमधील फायनलमध्ये हिंदुस्थानचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्विट केले. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचे अभिनंदन करताना मोदींनी हा विजय ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाशी जोडला. खेळाच्या मैदानावरही ‘ऑपरेशन सिंदूर’… निकाल तोच… हिंदुस्थान जिंकला!, असे मोदी म्हणाले. मोदींच्या या ट्विटला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी उत्तर दिले. ‘युद्ध हाच तुमच्या अभिमानाचा मापदंड असेल तर पाकिस्तानकडून तुमचा अनेकदा मानहानीकारक पराभव झाल्याची नोंद इतिहासात आहे. कोणताही क्रिकेट सामना ते सत्य बदलू शकत नाही. युद्धाला खेळात ओढणे हे फक्त तुमचे नैराश्य दाखवते आणि ते खिलाडू वृत्तीच्याही विरोधात आहे, असे नक्वी म्हणाले.

सूर्यकुमार यादवने माझ्याशी दोनदा गुपचूप हात मिळवला!

सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याच्याशी हस्तांदोलन न केल्याची सध्या खूप चर्चा आहे. त्यावरून सोशल मीडियात त्याचे काwतुक होत आहे. मात्र, सलमान आगाने वेगळाच गौप्यस्फोट केला. सूर्यकुमारने खासगीमध्ये माझ्याशी दोनदा हात मिळवला होता. मालिका सुरू होण्याआधीच्या पत्रकार परिषदेच्या वेळी त्याने हात मिळवला होता. शिवाय, सामनाधिकाऱयांच्या बैठकीत आमची भेट झाली तेव्हाही त्याने माझ्याशी हस्तांदोलन केले होते. केवळ कॅमेऱ्यासमोर त्याच्यासह इतर खेळाडूंनी हात मिळवणे टाळले, असे आगा म्हणाला.

  • पूर्ण संघाचे मानधन हिंदुस्थानच्या हल्ल्यात मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांस देण्याचे ठरवले आहे, असे कर्णधार सलमान आगा म्हणाला. पीसीबीने तर त्यांचा शहीद असा उल्लेख केला. यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता नवे दहशतवादी तयार होण्यास प्रोत्साहन मिळेल, असे नेटकऱयांनी म्हटले आहे.
    पहलगाममधील मृतांचे कुटुंबीय हेच सांगत होते!

पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, क्रिकेट खेळू नये अशी मागणी देशभरातून होत होती. त्यानंतरही गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांनी आपला अजेंडा पुढे रेटला. मोदी सरकारनेही त्यास हिरवा कंदील दाखवला. त्याविरोधात देशभरात आक्रोश होता. शिवसेनेने सरकारचा निषेध करत ‘माझं कुंकू माझा देश’ हे आंदोलन केले. पहलगाम पीडितांनीही सरकारला धारेवर धरले. पैशासाठी सरकार क्रिकेट खेळवत आहे, पण हा पैसा शेवटी आपल्या देशाविरोधात दहशतवाद पोसण्यासाठीच वापरला जाईल, अशी भीती पहलगाममध्ये बळी गेलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी व्यक्त केली होती. ती आज खरी ठरली.