पाकिस्तानी संघ अद्याप व्हिसाच्या प्रतीक्षेत, बाबरचे टेन्शन वाढले

आयसीसीच्या एक दिवसीय विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबरला होणार आहे. टीम इंडियासह, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि अनेक संघांच्या खेळाकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे. 29 सप्टेंबरपासून या स्पर्धेच्या सराव सामन्यांना सुरुवात होईल. मात्र, या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या पाकिस्तानी संघाचा व्हिसा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे या संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या चिंतेत आहे.

हिंदुस्थान या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असल्याने सर्व देशांच्या संघांना हिंदुस्थानचा व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तानी संघाच्या व्हिसाला हिंदुस्थानकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ईएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने विश्वचषकपूर्व कॅम्पसाठी दुबई जाण्याचा बेत आखला होता. तिथून ते सर्वजण हिंदुस्थानात दाखल होण्यासाठी हैदराबादची फ्लाईट पकडणार होते. पण, आता हा बेत फसला आहे. एक आठवड्यापूर्वी अर्ज देऊनही अद्याप त्यांना व्हिसा मिळालेला नाही.

व्हिसा मंजूर न झाल्यास कदाचित पाकिस्तानचा संघ आता लाहौरमधूनच 27 सप्टेंबर रोजी दुबईला जाणार आहे. त्यानंतर 29 सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी हिंदुस्थानात येईल. या दरम्यान व्हिसा मंजूर होईल असा विश्वास पाकिस्तानी संघाने व्यक्त केला आहे.