पाकिस्तानच्या कारागृहांत 682 हिंदुस्थानी कैद! इस्लामाबादेतील परराष्ट्र मंत्रालयाने दिली कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या कारागृहांत 682 हिंदुस्थानी नरकयातना भोगत आहेत. यात 49 सामान्य नागरिक व 633 मच्छीमार आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने ही कबुली दिली आहे. पाकिस्तानने डांबलेल्या कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील हिंदुस्थानींच्या सुटकेसाठी केंद्रातील मोदी सरकार ठोस पावले कधी उचलणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये 2008 मध्ये ‘कॉन्सुलर ऍक्सेस’ करार करण्यात आला. त्या करारानुसार दोन्ही देश त्यांच्या कारागृहांत कैद असलेल्या नागरिकांच्या यादीची देवाणघेवाण करतात. प्रत्येक वर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलैला ही यादी जाहीर केली जाते. त्यानुसार पाकिस्तानने कैद केलेल्या हिंदुस्थानींची आकडेवारी शुक्रवारी उघड केली. त्यामध्ये 682 हिंदुस्थानींना कैद केल्याचे पाकिस्तानने मान्य केले आहे. हिंदुस्थानच्या कारागृहांत कैद असलेल्या पाकिस्तानींच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. हिंदुस्थानने आपल्या कारागृहांत कैद केलेल्या 461 पाकिस्तानी कैद्यांची यादी शेअर केली आहे. यात 345 नागरिक आणि 116 मच्छीमारांचा समावेश आहे.

539 नागरिकांना कारागृहांतून सोडून द्या; हिंदुस्थानचे आवाहन

पाकिस्तानने तुरुंगवासाची मुदत पूर्ण केलेल्या 536 हिंदुस्थानी मच्छीमार व तीन सामान्य नागरिकांना कारागृहांतून सोडून द्यावे आणि मायदेशी पाठवावे, असे आवाहन हिंदुस्थानने केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या 105 मच्छीमार व 20 नागरिकांना तत्काळ कॉन्सुलर प्रवेश देण्यासही सांगितले आहे.