वेब न्यूज – जनता उपाशी आणि…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

गेल्या काही काळापासून पाकिस्तान या शेजारील देशाची अवस्था अत्यंत खालावलेली आहे. प्रचंड महागाईने त्रासलेली आणि उपासमारीचा सामना करणारी मोठय़ा प्रमाणावरील जनता रोज इथे आक्रोश करत आहे. अशा वेळी इथले राज्यकर्ते मात्र उपाशी जनतेला वाऱ्यावर सोडून कसे राजेशाही जीवन जगत आहेत याचे एकेक रंजक किस्से आता समोर येऊ लागले आहेत. पाकिस्तानच्या संसदेत देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका खर्चाचा आकडा समोर आला आहे आणि त्यामुळे तिथल्या जनतेकडून त्यांच्याविषयी मोठा राग व्यक्त केला जात आहे. पंतप्रधानपदाच्या आपल्या 2019 ते 2021 सालच्या कारकीर्दीत इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये असलेल्या पंतप्रधान निवासात राहण्यास नकार दिला होता. इस्लामाबादजवळ असलेल्या आपल्याला राजेशाही हवेलीमधून ते रोज इस्लामाबादच्या ऑफिसात ये-जा करत असत. त्यांच्या या रोजच्या प्रवासासाठी खास हेलिकॉप्टर, पायलट आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी एकूण 1500 पेक्षा जास्त तासांची हवाई सफर ऑफिसात येण्या-जाण्यासाठी केली आणि या सगळय़ावर 100 करोडपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. इम्रान खान यांच्या हट्टापायी इतकी मोठी रक्कम खर्च झाल्याचे समोर आल्याने संसदेतदेखील नाराजीचे सूर उमटल्याचे सांगितले जात आहे.

इस्लामाबादजवळील बानी गाला भागात 37.5 एकर इतक्या मोठय़ा जमिनीवर इम्रान खान यांची हवेली वसलेली आहे. तिची किंमत सहा हजार करोडच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. ऐशोआरामाच्या सर्व सुविधा असलेल्या या घराला सोडून पंतप्रधान निवासात राहण्यास इम्रान खान यांनी नकार दिला होता. तहरीक-ए-इंसाफ (PTI) या पक्षाचे प्रमुख असलेल्या इम्रान खान यांनी इतर अनेक गोष्टींवरदेखील वारेमाप पैसा उधळल्याची चर्चा आहे. आता त्यांची कोणती नवी प्रकरणे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.