
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान – पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या घटनेनंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकडे चांगलेच धास्तावले असून ते बिथरल्याने त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर हिंदुस्थानने बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानी जहाजांना हिंदुस्थानी बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. यामुळे पायाखालची जमीन सरकलेल्या पाकड्यांनी काही तासांतच हिंदुस्थानी जहाजांसाठी आपली बंदरे बंद केली आहेत.
पाकिस्तानच्या सागरी व्यवहार मंत्रालयाच्या बंदरे आणि शिपिंग विंगने शनिवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, सागरी परिस्थिती लक्षात घेता, पाकिस्तान आपल्या सागरी सार्वभौमत्वाचे, आर्थिक हितांचे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी तात्काळ अनेक पावले उचलणार आहे. त्यात हिंदुस्थानी जहाजे कोणत्याही पाकिस्तानी बंदरात येऊ शकणार नाहीत. पाकिस्तानी जहाजेही हिंदुस्थानी बंदरांकडे जाणार नाहीत. मात्र, अपवादात्मक परिस्थितीचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल, असे त्यात म्हटले आहे.
केंद्र सरकारने कठोर निर्णय घेत पाकिस्तानमधून किंवा पाकिस्तानमार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या आयात वस्तूंवर बंदी घातली होती आणि पाकिस्तानी जहाजांना हिंदुस्थानी बंदरांमध्ये प्रवेश करण्यासही बंदी घातली होती. तसेच पाकिस्तानसोबतची टपाल आणि पार्सल सेवाही हिंदुस्थानने बंद केली आहे.