मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड क्रूरकर्मा हाफीज सईदला पाकिस्तानात 11 वर्षे कारावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hafeez-sayid-1

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे नंदनवन बनले आहे. दहशतवाद्यांना तेथे पोसले जाते, हे पाकिस्तानातील न्यायालयातच आता सिद्ध झाले आहे. ‘टेरर फंडिंग’ केल्याच्या गुन्ह्यांसाठी मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड क्रूरकर्मा दहशतवादी हाफीज सईदला 11 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दहशतवाद्यांना पैसा पुरविणे, मनी लॉण्डरिंग, बेकायदेशीर ताबा मिळविणे आदी गुह्यांखाली क्रूरकर्मा हाफीज सईदविरुद्ध लाहोर आणि गुजरनवाला येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी न्यायालयात 11 डिसेंबरपासून रोज सुनावणी सुरू होती. दोन्ही गुह्यात हाफीजने दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याचे सिद्ध झाले आहे. दोन्ही गुह्यांत प्रत्येकी साडेपाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठविली. ही शिक्षा एकत्रच भोगायची आहे.

मुंबईवरील हल्ल्याच्या गुह्यात अद्याप शिक्षा नाही

मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद आहे. सईदविरुद्ध अनेक पुरावे हिंदुस्थानने पाकिस्तान सरकारला दिलेले आहेत. पाक सरकारने आजवर केवळ चौकशीचे नाटक केले. 26/11च्या गुह्यात अद्याप हाफिज सईदला शिक्षा झालेली नाही.

अमेरिकेकडून 10 दशलक्ष डॉलर्सचे इनाम जाहीर

लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या असलेला हाफिज सईदला ‘ग्लोबल टेररिस्ट’ म्हणून अमेरिकेने 2012 मध्ये जाहीर केले आहे. सईदची माहिती देणाऱयाला 10 दशलक्ष डॉलर्सचे इनामही अमेरिकेने जाहीर केले आहे. पाकिस्तानात मोकाट फिरणाऱया क्रूरकर्माचा पत्ता अद्याप पाक सरकारने अमेरिकेला दिलेला नाही.