लेख : पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचे वास्तव

619

>> विनायक श्रीधर अभ्यंकर

फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदू समाज गेली 70 वर्षे भयाच्या छायेत असून ओकरजाय कस्बा या वसाहतीमधील अल्पसंख्याक 125 परिवारातले लोक तालिबानी अत्याचारामुळे घरदार सोडून पळून गेले. पोलीस या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. मानवाधिकार आयोग पुढे म्हणतो, मदत करण्याऐवजी प्रशासन हिंदू-शीख यांना खोटय़ा आरोपात गुंतवून त्यांनाच आरोपीच्या पिंजऱयात उभे करते हे चित्र फार विदारक व चीड आणणारे आहे.

हिंदुस्थानची फाळणी झाली आणि धार्मिक उन्मादाचा आगडोंब भडकून लाखो निरपराध्यांची कत्तल करण्यात आली. नवनिर्मित पाकिस्तानमधून लाखोंच्या संख्येने हिंदू, शीख जिवाच्या आकांताने हिंदुस्थानात स्थलांतरित झाले. त्यांचे पुनर्वसन व धार्मिक शांतता ही गंभीर समस्या निर्माण होऊन अनेक प्रश्न हिंदुस्थान सरकारसमोर उभे ठाकले. धर्माधिष्ठत राष्ट्र उभारणीच्या उन्मत्त कृतीचा परिपाक होता तो. येथील हा प्रयत्न असफल व अयोग्य होता हे पूर्व पाकिस्तानने सिद्ध केले. धर्म एक असूनही पूर्व पाकिस्तान सध्याच्या बांग्लादेशच्या स्वरूपात फुटून बाहेर पडले तो दिवस खऱया अर्थाने पाकिस्तानच्या निर्मात्यांचा पराभव होता. धर्म ही श्रद्धा असली तरी त्याला सुयोग्य व्यवहाराची साथ नसली तर स्फोट होऊन ‘बांगलादेश’ जन्माला येतो. विशेषतः विविधतेने नटलेल्या या हिंदुस्थानी खंडात हे भान राजकीय नेतृत्वाने ठेवणे गरजेचे आहे.

कुठलेही सरकार जेव्हा आपल्या नागरिकांची सरसकट हत्या सहन करते तेव्हा त्याला कटकारस्थानाची किनार असते. जर्मनीमध्ये लाखो ज्यूंची हत्या ज्याप्रमाणे झाली तोच प्रकार फाळणी होत असताना झाला. अखंड हिंदुस्थान ही स्थानिकांची मातृभूमी असताना जिवाच्या आकांताने हिंदू-शीख एका वस्त्रानिशी बाहेर पडले, परागंदा झाले. हा प्रकार आजही चालू आहे. गिलगीट व बाल्टिस्तान भागातील अल्पसंख्याक व काही मुस्लिम बांधवांनी याविरोधात मोर्चा काढला, निदर्शने केली. पाकव्याप्त परिसरातील अल्पसंख्याकांची काळजी हा हिंदुस्थानचा विषय असून तो सोडवलाच पाहिजे.

तालिबानी व इस्लामी स्टेटचे पेव फुटल्यापासून हा प्रकार अलीकडे जास्त बोकाळला असून पाकिस्तानी राजवट तिकडे हेतूपुरस्सर कानाडोळा करीत आहे. हिंदू-शीख मुलींचे अपहरण व धर्मांतर ही शोकांतिका तेथील अल्पसंख्याक झेलत आहेत. कायदे आझम बॅ. जीना यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी सर्वधर्मसमभावाच्या केलेल्या घोषणेला नंतरच्या सर्वच पाकी शासकांनी हरताळ फासला. 1947 साली फाळणी झाली तेव्हा पाकमध्ये हिंदू समुदायाची संख्या 21 टक्के होती, ती सात दशकांत 2 टक्के इतक्या नीचांकी पोहोचली आहे. हिंदू मंदिरांची अवस्था एकतर खंडहर किंवा पशू कत्तलखाना अशी करण्यात आली आहे. बाबरी मशीद पतनानंतर तर मंदिरे नेस्तनाबूत झाली आहेत. बलुचिस्तान प्रांताने तर अल्पसंख्याकांवर जिझिया कर लागू केला असून तो भरला नाही तर धर्मांतर/मृत्यू किंवा देशाबाहेर हकालपट्टी. तालिबानी वा कट्टरपंथी अल्पसंख्याकांचे जिणे हैराण करीत आहेत. खंडणी हा प्रकार तर हिंदूंच्या माथी नित्याचा झाला आहे. खंडणी नाही दिल्यास तरुण मुलींना बळजबरीने पळवून मारून टाकणे हे प्रकार सर्रास चालू असतात.

काही दिवसांपूर्वी हसनअब्दाल या पंजाब प्रांतातील कन्हैयालाल या पापभिरू व्यापाऱयाची हत्या करण्यात आली. पोस्टमॉर्टेम करून शव हातात पडताच इंदुदराया स्मशानघाटावर नेत असताना शुब्द शीख व हिंदू समुदायाने तेथील हिंदू सांसद आरीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रेत रस्त्याच्या मधोमध ठेवून उग्र प्रदर्शने केली. वाहतूक बंद झाली, रावळपिंडी-पेशावर हा मार्ग बंद झाला. क्षुब्ध झालेले लोक कडक उन्हात अनवाणी निदर्शने करीत होते. त्यांची कैफियत होती, शासन जाणीवपूर्वक अशा प्रकारात आरोपीस पाठीशी घालत आहे.

आरीशकुमार यांनी हा मुद्दा पाकिस्तानी संसदेत मांडून प्रशासनास खडे बोल सुनावले. ते म्हणाले, दिवसेंदिवस पाकमधील हिंदू समाजाचे जिणे असुरक्षित होत असून न्यायापासून आम्ही वंचित आहोत. या प्रकरणाचा तपास 48 तासांत न झाल्यास देशभर उग्र निदर्शने करू. 70 वर्षीय कन्हैयालाल बडग्राममध्ये झालेल्या भूकंपामुळे हसनअब्दाल या कसब्यात स्थलांतरित झाला होता. अशा प्रकारामुळे पाकस्थित अल्पसंख्याक विभिन्न भागांत किंवा हिंदुस्थानात आसरा शोधतात. सतत आतंकवादी नरकयातनांच्या छायेत हा समाज आपल्याच देशात जगणे ढकलत आहे.

यावर प्रकाशझोत टाकला आहे तो दस्तुरखुद्द पाकिस्तानी मानवाधिकार आयोगाने. फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदू समाज गेली 70 वर्षे भयाच्या छायेत असून ओकरजाय कस्बा या वसाहतीमधील अल्पसंख्याक 125 परिवारातले लोक तालिबानी अत्याचारामुळे घरदार सोडून पळून गेले. पोलीस या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. मानवाधिकार आयोग पुढे म्हणतो, मदत करण्याऐवजी प्रशासन हिंदू-शीख यांना खोटय़ा आरोपात गुंतवून त्यांनाच आरोपीच्या पिंजऱयात उभे करते हे चित्र फार विदारक व चीड आणणारे आहे.

आजच्या घडीला पाकिस्तानात दोनच जिह्यांत अल्पसंख्याकांची संख्या 30 टक्के उरली आहे. कराची शहरात अल्पसंख्याकांची मालमत्ता लुटणे, मुलींचे अपहरण करून जबरदस्ती उपभोग घेऊन धर्मांतरित करणे ही नित्याची बाब झाली आहे. विसाव्या शतकाच्या शेवटी कराचीत हिंदूंची संख्या पाकी जनगणनेनुसार 9लाख 75 हजार 300 होती. तेथे हिंदू फक्त 45 हजार म्हणजे नावाला उरले असून मुस्लिम प्रमाण 80 टक्क्यांवर आले आहे. पाकिस्तानमधील 88 जिल्हे असे आहेत की जेथे अल्पसंख्याक 1 टक्का आहेत. उमरकोट परगण्यात आजच्या मितीला सर्वात जास्त म्हणजे अडीच लाख अल्पसंख्याक आहेत. पाकची आज जनसंख्या 15 कोटींपेक्षा जास्त असून हिंदूंची आबादी 20 लाखांपर्यंत घसरली आहे जी 1947-48 साली 21 टक्के इतकी होती. गेल्या चार-पाच वर्षांत क्वेट्टा, मुलतान, उमरकोट इत्यादी व्यापारी पेढय़ांतील अनेक हिंदू व्यापाऱयांची कत्तल करण्यात आली आहे.

कश्मिरी युवकांनी याचा गंभीर विचार करणे अगत्याचे असून त्यांनी हिंदुस्थानी मूळ प्रवाहात सामील होऊन विकास साधावा. यातच त्यांचे हित आहे. पाकमधील हिंदू-शीख समाजाचे एक दुखणे म्हणजे हिंदुस्थान सरकारही आमच्याकडे कानाडोळा करून मदतीस धावून येत नाही. 1971 च्या युद्धातला एक किस्सा मांडून लेख संपवतो. पाकी युद्धबंदीची शिरगणती करतानाचा प्रसंग. पाकी जवानांना सहज नाव विचारले असता त्यांची नावे पंकज मसी, कमल मसी, सुदीन मसी, जगू मसी इत्यादी सांगत. तेव्हा सहज विचारता एकजण म्हणाला, आम्ही मूळचे हिंदू मेहतर. आम्हाला जबरदस्ती इथे (पाकमध्ये) रोखले ‘मैला’ वाहून नेण्यासाठी. हिंदू म्हणून जगता येत नव्हते. झालो ख्रिश्चन. मसीह, प्रेषक, इस्सा मसीह. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातले अल्पसंख्याक किती सुखी व सुरक्षित आहेत याचा विचार करून सर्वांनी या मातृभूमीच्या विकासात हातभार लावावा, असे प्रकर्षाने वाटते.

(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या