अमेरिकेच्या पत्रकाराचे ISI शी गुप्त संबंध, हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या अमेरिकी पत्रकाराचे ISI शी गुप्त संबंध असल्याचे वृत्त झी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे. सिथिंया रिची असं या महिला पत्रकाराचे नाव आहे. सिंथिया रिची नावाची ही पत्रकार पाकिस्तानचे गुप्तचर यंत्रणा ISI आणि ISPR (आंतरसेवा जनसंपर्क संस्था) यांच्यासाठी काम करत असल्याचं वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.

सिंथिया रिची ही पाकिस्तानात दीर्घकाळ वास्तव्यास असून व्हीसाची मुदत वाढवण्यासाठी तिने पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाला विनंती करणारं पत्र लिहिलं होतं. यामध्ये तिने म्हटलंय की ती वॉकअबाऊट फिल्म खैबर पख्तुन्वा आणि ISPR साठी चित्रपट आणि लघुपट बनवण्याचे काम करते आहे. या कामांमुळे आपला व्हिसाचा कालावधी 1 वर्षाने वाढवण्यात यावा अशी विनंती सिंथीयाने केली आहे. सिंथीयाने हे पत्र गृहमंत्रालयाच्या उपसचिवांना लिहिलं असून तिने यात म्हटलंय की तिचा व्यावसायिका कामांसाठीचा व्हिसा 18 मार्चला जारी करण्यात आला होता. आपण वॉकअबाऊट फिल्म , ISPR आणि खैबर पख्तुनवा सरकारसाठी काही चित्रपटांच्या कामात गुंतलेलो असून व्हिसाचा कालावधी 1 वर्षांनी वाढवावा.

झी न्यूजच्या बातमीमध्ये म्हटलंय की हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणांनी सिंथीया रिची ही दीर्घकाळापासून ISI आणि ISPR साठी काम करत आहे. पाकिस्तानच्या सांगण्यावरून तिने हिंदुस्थानविरोधात सोशल मीडियावरून गरळ ओकण्याचे काम केले आहे. बालाकोट इथे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे हिंदुस्थानने उध्वस्त केल्यानंतर सिंथीयाने या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. काही दिवसांपूर्वी सिंथीयाने पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. आपल्यावर 2011 साली राष्ट्रपती भवनात मलिक यांनी बलात्कार केल्याचं सिंथीयाने म्हटलं होतं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनीही आपल्यासोबत अश्लील चाळे केले असं तिचं म्हणणं आहे. राष्ट्रपती भवनात माझं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि नंतर गुंगीचे औषध मिसळलेले पेय देऊन आपल्यावर बलात्कार केला असं सिंथीयाने म्हटलं आहे.