कराचीत स्फोटाने इमारत ढासळली; तिघांचा मृत्यू, 15 जखमी

पाकिस्तानातील कराची शहरात गलुशन ए इकबाल भागात मसकन इमारतीत झालेल्या जोरदार स्फोटाने इमारतीचा एक भाग ढासळला आहे. या स्फोटात तीनजणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाने बाजूच्या इमारतीतील खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. या स्फोटामागे घातपाताची शक्यता असल्याने बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथकलाही बोलावण्यात आले आहे.

हा स्फोट नेमका कशाने झाला, याची माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी हा सिलिंडर स्फोट असण्याची शक्यता वर्तवली आहे. तर घातपाताची शक्यता लक्षात घेत बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथकाला बोलावण्यात आले आहे. पथकाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरक्षेसाठी परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. हा स्फोट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या स्फोटामुळे इमारतीचा एक भाग ढासळला आहे. तसेच आजूबाजूच्या इमारतींच्या काचा तुटल्या असून इमारतींचेही नुकसान झाले आहे. तसेच काही वाहनांचेही नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानात घातपाताच्या घटना वाढल्या आहेत. कराचीत मंगळवारी एक बस टर्मिनलजवळ बॉम्बस्फोट झाला होता. त्यात पाचजण जखमी झाले होते. तसेच गेल्या आठवड्यात ग्वादर तेलकंपनीचे कर्मचारी आणि लष्कराच्या जवानांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करून हल्ला केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या