पाकिस्तानात सत्तेसाठी मारामारी, त्रिशंकू संसद टाळण्यासाठी प्रमुख पक्षांची चर्चा

सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांअंती पाकिस्तानात त्रिशंकू संसद येण्याचेच चित्र स्पष्ट झाल्यावर, तीन प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आघाडी सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना रविवारी वेग दिला आहे.

इम्रानची जलदगती, नवाज बॅकफूटवर
नॅशनल असेंब्लीतील जाहीर 264 निकालांपैकी, कारावासातील माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक पक्षाच्या पाठबळावरील अपक्ष उमेदवारांनी 101 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाने फक्त 75 जागा जिंकल्या आहेत. असिफ अली जरदारी यांच्या पीपीपीने तर अवघ्या 54 जागा मिळवल्या आहेत. कराचीतील एमक्यूएम पक्षाने 17 तर उर्वरित लहान पक्षांनी 12 जागा जिंकल्या आहेत.

या निकालांतून त्रिशंकू संसदेचेच चित्र स्पष्ट झाल्यावर नवाझ शरीफ यांनी आघाडी सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले होते. लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी शरीफ यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. शरिफ यांच्या पक्षाने जरदारी यांचा पीपीपी, एमक्यूएम यांसारख्या पक्षांशी या दृष्टीने बोलणी सुरू केली आहेत.