पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा विजयाचा दावा

हिंदुस्थानच्या माऱ्यापुढे गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानने विनंती केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार झाला. त्यानंतर अवघ्या तीन तासांत पाकिस्तानी सैन्याने एलओसीवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला. तसेच अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले, क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला हिंदुस्थानी लष्कराने परतावून लावला.  असे असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी  आपला विजय झाल्याचा दावा केला असून शस्त्रसंधीचे पालन करण्यासाठी प्रामाणिक राहू असे आश्वासन दिले आहे. तसेच शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल शाहबाज यांनी ट्रम्प यांची प्रशंसा केली आहे.

शस्त्रसंधीनंतरही हिंदुस्थानी लष्कराचे जवान पाकिस्तानातील काही ठिकाणी हल्ले करत आहेत. असे असतानाही पाकिस्तानी सैनिक जबाबदारी आणि संयमाने सर्व परिस्थितीचा सामना करत आहेत, असा कांगावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’वरून केला. याचदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांची प्रशंसा केली.