
‘हिंदुस्थानविरुद्धची मॅच आपण जिंकू शकणार नाही. त्यापेक्षा गोळीबार करून ही मॅचच थांबवा,’ अशी अतिरेकी मागणी पाकिस्तानी चॅनेलवरील लाइव्ह कार्यक्रमात एका विश्लेषकाने केली. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून पाकिस्तानची खुनशी मानसिकता समोर आल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानशी क्रिकेटचा हट्ट धरणारे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्यावरही सोशल मीडियात टीकेची झोड उठली आहे.
आशिया कप स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीत रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये सामना झाला. पाकिस्तानच्या एका चॅनेलवर या सामन्याचे विश्लेषण सुरू होते. त्या चर्चेची एक व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यात सूत्रसंचालक एका विश्लेषकाला विचारतो की या टप्प्यावर आपले खेळाडू जीव तोडून खेळले तर आपण जिंकू शकतो का? त्यावर तो म्हणतो, एक तर त्यांनी जीव तोडून खेळावे किंवा थेट गोळीबार करावा आणि सामनाच बंद पाडावा. कारण असेही आपण हरणारच आहोत. या वक्तव्यानंतर तो हसत असल्याचे दिसत आहे. त्यावरून आता वाद सुरू झाला आहे.
सूर्यकुमार यादवच्या नावाचे विडंबन
आशिया कपच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करणे टाळले होते. त्यावरून पाकचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने एका चर्चेत सूर्यकुमार यादवच्या नावाचा उल्लेख ‘सुअरकुमार’ असा केला. टीका झाल्यानंतर त्याने यावर सारवासारव केली.
डीन जोन्स यांच्यावर झाली होती कारवाई
क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध काही विधाने करण्याचे प्रकार नवे नाहीत. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी एकदा समालोचन करताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमला याच्या विरोधात भयंकर टिप्पणी केली होती. हाशिम आमलाला ते ‘टेररिस्ट’ म्हणाले होते. त्यावरून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. जोन्स यांना या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली होती.
जय शहा सोशल मीडियात ट्रोल
हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान याच्या मैदानातील अतिरेकी कृत्यांमुळे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा ट्रोल होत आहेत. ‘आपण जय शहासारख्या लोकांना आणि बीसीसीआयला लाडावून ठेवल्यामुळे या दहशतवाद्यांना अशी संधी मिळते, असे एका नेटकऱयाने म्हटले आहे. जय शहा हे केवळ समस्येचा एक भाग आहेत. खरी समस्या मोदी-शहा आहेत. ते एका फोनवर हा सामना थांबवू शकले असते, पण त्यांनी ते केले नाही, असे दुसऱयाने म्हटले आहे.
बझुका सेलीब्रेशन
पाकचा सलामीवीर साहिबजादा फरहानने अर्धशतक झाल्यानंतर बॅटला एके-47 बंदुकीप्रमाणे पकडून गोळ्या झाडण्याची ऍक्शन केली. या सेलिब्रेशनला बझुका सेलिब्रेशन म्हणतात. बझुका हे रॉकेट लाँचर आहे. दुसऱया महायुद्धात अमेरिकेने याचा वापर केला होता. अर्धशतक ठोकून प्रतिस्पर्ध्यावर रॉकेट डागल्याचे साहिबजादाला सुचवायचे होते.
आम्ही सहा विमानं पाडली… तुम्ही एकही नाही
सीमारेषेवर असलेल्या पाकिस्तानच्या हारिस रौफने हिंदुस्थानी चाहत्यांना डिवचले. त्याने विमानांच्या उड्डाणाची व कोसळण्याची ऍक्शन केली. युद्धात ‘आम्ही तुमची सहा विमाने पाडली. तुम्हाला एकही पाडता आले नाही’, हे तो सांगू पाहत होता. खेळाच्या मैदानात असतानाही पाकिस्तानी खेळाडूंच्या डोक्यात युद्धच होते हेच यातून दिसून आले.