दंगलीत पाकिस्तानचा हात भाजप आमदाराचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले. या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांना अटक केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी गृह मंत्रालयाला अंतरिम अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये या हिंसाचारामागे ‘गुन्हेगारी कट’ असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. परंतु दुसरीकडे भाजपच्या एका आमदाराने जहांगीरपुरी हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातील लोणी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी हा हिंसाचार पाकिस्तानच्या आयएसआय आणि कट्टरपंथी संघटनांकडून हिंदूंविरुद्ध रचलेल्या कटाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी गृहमंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात हा हिंसाचार एक ‘गुन्हेगारी कट’ असल्याचे म्हटले आहे.

जहांगीरपुरी भागात हिंसाचार भडकून तीन दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतरही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांना अटक केली असून 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंती मिरवणूक सुरू असताना मुख्य आरोपी अन्सारला फोन आला होता. त्या फोन कॉलचा तपशील पोलिसांकडून तपासला जात आहे.

जहांगीरपुरी हिंसाचाराच्या दिवशी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने जंतर-मंतरवर आयोजित केलेल्या निषेध मोर्चाचीही दिल्ली पोलीस चौकशी करत आहेत. जहांगीरपुरी परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने पोलिसांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढली होती त्यामुळे दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी विहिंप नेते प्रेम शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विहिंप आणि बजरंग दलाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी एक निवेदन जारी केले आहे. ज्यात ते विहिंप सदस्यांवरील खटला खोटा असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवलयास त्यांची प्रतिमा मलीन होईल असे सांगण्यात आले आहे.

हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी अन्सारबाबत पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत. पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे अन्सारचे वडिलोपार्जित घर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आता अन्सारची पार्श्वभूमी तपासत असून ते याप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांची मदत घेत आहेत.