पालम – शेतीच्या वाटणीसाठी मुलाने केला वडिलांचा खून, झोपेत असतानाच डोक्यात घातला लाकडी दांडका

2758
प्रातिनिधिक फोटो

पालम तालुक्यातील पेन्डू येथे शेतीची वाटणी करण्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना 15 जुलैला रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे.

रामराव शेषराव धूळगुंडे (वय 60 वर्ष) असे मयताचे नाव आहे. पेन्डू शिवारात धूळगुंडे परिवारला 9 एकर शेती असून रामराव धूळगुंडे यांना 3 मुले आहेत. या तिघांना 6 एकर शेती वाटणी करून गावानजीकची 3 एकर शेती त्यांनी स्वतः च्या उदरनिर्वाहासाठी ठेवली होती. या शेतातील हिस्सा मला विकायचा आहे, तो वाटून द्या म्हणून आरोपी उत्तम रामराव धूळगुंडे (वय 32 वर्ष) याने तगादा लावला होता. तो व्यसनी असल्याने त्याचे कुटुंब गावात न राहता पत्नी मुलासह माहेरी राहते.

शेती नावाने करून दिल्यास विक्री करेल या भीती पोटी आई-वडिलांनी वाटणी करण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून उत्तम धूळगुंडे हा आई-वडिलांना दारू पिऊन नेहमी माराहाण करीत होता. 15 जुलैला शेतात काम करुन थकलेले रामराव धूळगुंडे आखाड्यावर झोपले असताना आरोपी मुलाने लाकडाने माराहाण करून त्यांचा खून केला आहे.

मयताची पत्नी हारिबाई धूळगुंडे या 16 जुलै रोजी सकाळच्या सुमारास शेतात गेल्या असता रामराव याचा मृतदेह बाजेवर दिसला. बाजूच्या खोलीत आरोपी मुलाला पाहून त्यांनी घात झाल्याचा टाहो फोडून गाव गाठले व गावकऱ्यांना घेऊन घटनास्थळी गाठले.

हारिबाई रामराव धूळगुंडे याच्या फिर्यादी वरून उत्तम रामराव धूळगुंडे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे . पोलीस निरीक्षक सुनील माने, जमादार नामदेव राठोड पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या