दापोलीतील पाळंदे समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला; कोकण मेव्याच्या मागणीने विक्रेते सुखावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालूक्यातील केळशी ते दाभोळपर्यंतच्या सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहेत. त्यामुळे व्यावसायिक सुखावले आहेत. तसेच स्थानिक कोकणी मेव्यालाही चांगली मागणी असल्याने स्थानिक विक्रेत्यांचाही फायदा होत आहे.

उन्हाळी हंगामाच्या अखेरच्या दिवसात दापोलीतील दाभोळपासून ते पार केळशीपर्यंतच्या समुद्रकिनारपट्टीवर पर्यटक भटकंतीसाठी मोठया प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यामुळे सुटीच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे पर्यटक व्यवसायिक सुखावले आहेत. अअनेक व्यावसायिकांनी हाऊस फुल्लचे फलक लावले आहेत. त्यामुळे पर्यटकांना राहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यापासून लांबच्या ठिकाणी जावे लागत आहे.

पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, पिंपरी, चिंचवड, नाशिक, नगर आदींसारख्या शहरात उष्णतेने त्रस्त झालेल्या अनेकांनी कोकणातील दापोलीतील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा गाठला आहे. त्यामुळे दापोलीतील केळशी, आडे, पाडले, आंजर्ले, हर्णे, पाळंदे, सालदुरे, मुरूड, कर्दे, लाडघर, तामसतीर्थ,बुरोंडी, कोळथरे, पंचनदी, भिवबंदर आणि दाभोळ या गावातील सर्वच ठिकाणच्या समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. त्यात विशेषतः पाळंदे समुद्रकिनारा आठवडाभर पर्यटकांच्या गर्दीने चांगलाच फुलला आहे.

पर्यटकांच्या दापोलीतील आगमनाने हापूस आंबा, काजूगर, कापे तसेच बरके फणस, फणसाच्या आठळया, फणसाचे तळलेले गरे, फणसाचे वाळलेले गरे, आमसुल, कोकम साल, आगळ, अमृत कोकम आदी स्थानिक मालाच्या उत्पादनाची चांगली विक्री होत असल्याने कोकणी मेव्याला जागेवरच चांगली बाजारपेठ मिळाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने काही मालाचा तुटवडा जाणवायला लागला असून यात मासळीच्या टंचाईने मासळीचे दर चांगलेच कडाडले असून खवय्यांची अडचण होत आहे. तसेच दुध दुभत्यावरही परिणाम झाला असून उन्हाच्या कडाक्यामुळे पाण्याचे स्रोत आटल्याने व्यवसायिकांना पाणी टंचाईची समस्या सतावत आहे.

पर्यटकांच्या येण्याने पर्यटन व्यवसाय बहरला असला तरी सध्या पावसाची तयारी म्हणून सुक्या माशांची बेगमी करण्यास आणि घरची कामे करण्यास स्थानिक गुंतले असल्याने मनुष्यबळाचाही कमतरता जाणवत आहे. वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना सुटीच्या अखेरच्या टप्प्यात चांगला व्यवसाय मिळत आहे.