गोड पाडवा… रुग्णसंख्या शून्यावर पालघर, ठाण्यात कोरोनामुक्तीची गुढी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नववर्षाच्या स्वागत यात्रेचे ढोलताशे वाजण्यास आता काही तास उरले असतानाच पालघर व ठाणे ग्रामीण जिल्हावासीयांसाठी गोड पाडवा आहे. दोन्ही जिल्ह्यांत रुग्णसंख्या शून्यावर आल्याने पालघर व ठाण्यात खऱ्या अर्थाने कोरोनामुक्तीची गुढी उभारण्यात आली आहे. राज्य सरकारने सर्व निर्बंधदेखील उठवले असून नवीन वर्ष आनंदाचे व आरोग्यदायी जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काळजी घेतली आहे.

दोन वर्षांनंतर ठाणे ग्रामीणमधील कोरोना बाधितांचा आकडा शून्यावर आला आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. ठाणे ग्रामीण जिल्ह्यात कोरोनाच्या एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. जनजागृती, आरोग्य कर्मचारी, आशा वर्वâर, डॉक्टर, परिचारिका यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मेहनत घेतल्यामुळेच हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे व पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती ज्ञानेश्वर सांबरे यांनी व्यक्त केली आहे.

– ठाणे ग्रामीणमधील कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या पाच तालुक्यांमध्ये आतापर्यंत 49 हजार 208 रुग्णांची नोंद झाली. यापैकी 47 हजार 954 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर दुर्दैवाने 1254 रुग्णांचा मृत्यू झाला.

– पालघर जिल्ह्यातही कोरोनाची पहिली लाट सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 लाख ५८ हजार ६०८ रुग्ण बाधित होते. या तिन्ही लाटेमध्ये ३ हजार ३०७ जणांना आपला जीव गमवावा लागला.

– 1 लाख 55 हजार 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात फक्त एकच रुग्ण सध्या असून त्याला एक-दोन दिवसांत डिस्चार्ज दिला जाणार आहे.

लसीकरणावर जोर

ठाणे ग्रामीणमधील 11 लाख 35 हजार 132 नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये 9 लाख 40 हजार 77 जणांचा पहिला तर 6 लाख 71 हजार ९८ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर 5 हजार 508 नागरिकांनी बुस्टर घेतला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. दरम्यान पालघर जिल्ह्यातही २४ लाख 23 हजार 713 जणांनी पहिला डोस घेतला. तर 21 लाख 56 हजार 392 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. बुस्टर डोस घेतलेल्यांची संख्या 33 हजार 389 एवढी आहे.

यामुळेच मिळाले यश

ठाणे व पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व प्रशासनाने सक्षमपणे एकत्रित काम केल्यानेच दोन्ही जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. कोविडविरुद्धच्या या लढ्यात याबाबींवर विशेष जोर देण्यात आला..

चाचणी
सर्वेक्षण
स्वच्छतेवर भर
उपचार
ट्रेसिंग
लसीकरण
सोशल डिस्टन्सिंग
मास्क
सॅनिटाझयरचा वापर.