
सामना ऑनलाईन । बोईसर
पालघर लोकसभा मतदारसंघात सोमवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. मतदान संपल्यानंतर चिंचरे येथील बुथ क्रमांक १७ मधील काही कर्मचाऱ्यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या बसमधून न जाता एका खासगी वाहनातून इव्हीएम मशीन नेली. याची माहिती काही दक्ष नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी किराट गावाजवळ गाडी अडवली आणि त्यांना पोलिसांच्या हवाली केलं. यामुळे इव्हीएम घोटाळ्याप्रकरणी संशय वाढला आहे.
पाहा व्हिडीओ:
चिंचरे येथील बुथ क्रमांक १७ येथे मतदान संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना सर्व वस्तू आणि यंत्र नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व कर्मचाऱ्यांनी या बसमधूनच इव्हीएम मशीन परत नेणे आवश्यक असताना देखील काही कर्मचाऱ्यांनी इव्हीएम मशीन ही एमएच-०३ बीएस – ०९८० या खासगी वाहनातून नेली. ही बाब दक्ष नागरिकांना लक्षात आली. त्यांनी तात्काळ किराट गावाजवळ गाडी अडवली आणि त्यांची चौकशी केली. तेव्हा गाडीतील कर्मचारी वाद घालू लागले. अखेर नागरिकांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी या संशयीत कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकाराची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. रात्रीपर्यंत कारवाई सुरू होती. तसेच जिल्हाधिकार प्रशांत नागनवरे यांनी देखील घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.



























































