
सामना प्रतिनिधी । पालघर
मतदान यंत्रातील घोळामुळे निवडणुकीचा पुरता विचका उडाला असतानाच आता मतदार याद्यांमधून २५ हजार नावे गायब असल्याचे समोर आले आहे. संतापजनक म्हणजे मृत आणि स्थलांतरित झालेल्या हजारो मतदारांच्या नावांना साधा ‘हातही’ लावण्यात आला नसून बोगस व्होटिंगसाठीच ही नावे कायम ठेवल्याचा आरोप केला जात आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत अवघे ५३.२२ टक्केच मतदान झाले आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणूकीमध्ये ८ लाख ८७ हजार ६८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये ४ लाख ८१ हजार ७४२ पुरुष तर ४ लाख ५ हजार ९२७ महिला मतदारांचा समावेश आहे. सोमवारी निवडणूक यंत्रणेने ४६.५० टक्के मतदान जाहीर केले होते.
पालघर जिल्ह्यात दोन हजार सत्त्याण्णव मतदान केंद्रे असून सर्वच ठिकाणी बुथमधील मतदार याद्यांमधून दीडशेच्या आसपास नावे गायब करण्यात आली आहेत, तर अनेक ठिकाणी मतदारांची नावे भलत्याच मतदान केंद्रांमध्ये टाकण्यात आली होती. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला. त्यांना आपली नावे शोधताना भरउन्हाच्या तडाख्यात फरफट करावी लागली. त्यामुळे मतदार सहायता केंद्रावर नावे शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दरम्यान, ईव्हीएम मशीनमधील घोळ, उन्हाचा तडाखा आणि सुट्टीत गावी गेलेल्या मतदारांमुळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४६.५० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
भाजपच्या गुंडगिरीला युवासैनिकांचा दणका
पराभवाच्या भीतीने हादरलेले भाजपचे डहाणू येथील आमदार पास्कल धनारे यांनी ठाणे येथील युवासेनेचे उपसमन्वयक सिद्धेश आंबरे, सरचिटणीस राहुल अवघडे, भारती गायकवाड, भूषण राणे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न तलासरीत केला. मात्र युवासैनिकांनी जशास तसे उत्तर देत भाजपची गुंडगिरी मोडून काढली.
ईव्हीएम मशीनच्या गोंधळाची जबाबदारी घ्यावीच लागेल!
ईव्हीएम मशीनमध्ये सकाळपासून बिघाड झाल्याने असंख्य मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या तरी कशा? या मशीन इलेक्ट्रिक सेन्सिटिव्ह आहेत हे माहीत असूनही तुम्ही तशी व्यवस्था का केली नाही, असा सवाल शिवसेनेने केला आहे. ईव्हीएम मशीनच्या या गोंधळानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. एवढेच नव्हेतर या गोंधळाची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल, अशा शब्दांत बजावले. तसेच मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आदिवासी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मतदान केंद्रे होती. वसई, विरारसह वागरजे, रानशेत, तारापूर, तळपाळे, चारोटी, रायतळी, धानीवटी, नागेरा, धामणी, कासा, सायवण या केंद्रांवर इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन बंद पडली. त्यामुळे आदिवासी भागातील मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. ईव्हीएम मशीनच्या या गोंधळाची माहिती मिळताच शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी, अनिल भोर, अरुण रेडकर, दिनेश बोभाटे आदींनी मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली.
२०१९ची निवडणूक कशी घेणार?
या गैरप्रकाराला केवळ प्रशासन जबाबदार असून त्याचा नाहक त्रास मतदारांना भोगावा लागला. मोठय़ा प्रमाणावर ईव्हीएम मशीन बंद पडणे हा प्रकार आदर्श आचारसंहितेला काळिमा फासणारा असून तुम्हाला लोकसभेची पोटनिवडणूक व्यवस्थित घेता येत नाही तर २०१९ची निवडणूक कशी काय घेणार, असा संतप्त सवाल खासदार अनिल देसाई यांनी विचारला.
विजयाचा गुलाल शिवसेनाच उधळेल!
मतदान यंत्रांमध्ये कितीही घोळ करण्याचा प्रयत्न केला तरी विजयाचा गुलाल शिवसेनाच उधळेल, असा विश्वास शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती सभा आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दणदणीत रोड शो, हीच आमच्यासाठी विजयाची पावती होती, असेही शिंदे यांनी सांगितले.
विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे:
१) विक्रमगड: १,५८,०३० (६२.६४)
२) डहाणू : १,४९,२६६ (५८.९८)
३) बोईसर: १,५१,८३३ (५८.७५)
४) पालघर: १,४४,९०५ (५५.७५)
५) वसई: १,३२,९६६ (४८.४०)
६) नालासोपारा:१,५०,६८७ (३४.८३)
विक्रमगड मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले.
































































