
पालघर जिह्यातील डहाणू तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ डोंगरपायथ्याशी नवसाला पावणाऱया श्री महालक्ष्मीचे देवस्थान आहे. डहाणूची महालक्ष्मी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी स्थळे वेगवेगळी असली तरी देवतेचं रूप एकच आहे. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेपासून वद्य अष्टमीपर्यंत महालक्ष्मीचा जत्रोत्सव साजरा होत असतो. चैत्र पौर्णिमेला मोठा तर वद्य अष्टमीला लहान होम असतो. देवीचा वर्षातून एकदा होणारा उत्सव सोडून अश्विन शुद्ध 12, माघ शुद्ध 12 आणि भाद्रपद शुद्ध 12 असे तीन मोठे उत्सव होतात. या उत्सवात आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने भाग घेतात. तारपाच्या तालावर रात्रभर त्यांचा नाच उत्सव चालू असतो. महाराष्ट्र, गुजरातमधूनदेखील भाविक मोठय़ा संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात.

























































