
सामना प्रतिनिधी, बेलवाडी
पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ… ढगांनी आभाळात केलेली गर्दी अन् ऊन सावलीच्या सुरू असलेल्या खेळामध्ये बेलवाडी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे पहिले गोल रिंगण उत्साहात झाले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती. सणसर (ता. इंदापूर) येथील पालखीचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा सकाळी साडेसात वाजता बेलवाडी गावामध्ये दाखल झाला. आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे व मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले.
‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. मेंढ्यांनी रिंगणाला पहिल्या तीन फेऱ्या मारून सुरुवात केली. झेंडेकरीही देहभान हरपून रिंगणाला फेऱ्या घातल्या. महिला डोक्यावरती तुळस व हंडा घेऊन धावल्या. विणेकरी व पखवाजवालेही देहभान हरपून धावले. अश्वांचे रिंगण पाहण्यासाठी वैष्णव आतुरले होते. मानाचे अश्व रिंगण सोहळ्यामध्ये धावण्यास सुरुवात होताच ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमले. मानाच्या अश्वांनी रिंगण सोहळ्याच्या तीन फेऱ्या पूर्ण करताच नागरिकांनी अश्वाच्या पायाखालची धूळ घेऊन मस्तकाला लावण्यासाठी गर्दी केली. रिंगण सोहळा पूर्ण होताच पालखी तळावर फुगडी व वारकऱ्यांचे खेळ रंगले.



























































