
नगरपालिकेच्या निवडणुकीत एका मताला १५ ते २० हजार रुपये सत्ताधाऱ्यांनी वाटले. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या १८३७१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी केवळ ४ कोटी ८ लाख रुपयाची तुटपुंजी मदत महायुती सरकारने जाहीर केली आहे. या रक्कमेतून प्रत्येक शेतकऱ्याला केवळ २२२४ रु. नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे. याचेही श्रेय पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे हे दोघेही घेत आहेत. निवडणुकीत वारेमाप पैसा उधळला आणि शेतकऱ्यांना मात्र तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार महायुती सरकारने केला आहे, अशी टीका माजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा नक्कीच विचार करावा, असे ते म्हणाले आहेत.
वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मी व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी नुकसानीची पाहणी करून कृषीमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पंचनामे करून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८३७१ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता. मात्र महायुती सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केवळ ४ कोटी ८ लाख रुपयाची तुटपुंजी मदत जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला फक्त २२२४ रु. नुकसान भरपाई मिळणार आहे.
मात्र नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंद केली पाहिजे, सातबारा व आठ अ ,बँक पासबुक इतर कागदपत्रे गोळा केली पाहिजेत. नुकसानीचे फोटो काढले पाहिजेत. तालुक्याला जाऊन कृषीसेवकांना, तलाठ्यांना आपल्या शेतात आणून पंचनामा केला पाहिजे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला १ हजार रुपये पर्यंत खर्च होऊन शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडे सारख्या खेटा माराव्या लागल्या. हे सर्व करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी केवळ २२२४ रु. मिळणार असतील तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. माझे सत्ताधाऱ्यांना सांगणे आहे की, सत्ताधाऱ्यांनी नुकसान भरपाईचे श्रेय घेण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांचे किती रुपये नुकसान झाले हे विचारावे आणि सरकारकडून तुम्ही किती रुपये मदत प्रत्येक शेतकऱ्याला देणार हे सांगावे, असे आव्हान माजी आमदार वैभव नाईक यांनी दिले.



























































