
पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हे कार्ड जोडण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2019 पर्यंत होती. ती आता 31 डिसेंबर 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे.
आयकर विभागाकडील माहितीनुसार 8.47 कोटी नोंदणी झालेल्यांपैकी 6.77 कोटी लोकांनी आधार पॅन कार्डला लिंक केले आहे. 1 एप्रिल 2019 पासून इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी आधार-पॅन कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे. 31 डिसेंबरपर्यंत आधार पॅन कार्डला जोडले नाही तर ते रद्द होणार आहे. आयकर खात्याच्या वेबसाइटवर किंवा एसएमएसद्वारे आधार पॅनकार्डला लिंक करता येणार आहे. हे लिंक करताना नाव, जन्मतारीख, लिंग योग्य असल्याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यात तफावत असल्यास ती दुरुस्त करून आधार पॅनशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




























































