चंद्रपूर – प्राचीन तलावाच्या खोदकामादरम्यान पंचमुखी शिवलिंग सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भेजगावातील तलावाचे खोदकाम सुरू असताना दुर्मिळ पंचमुखी शिवलिंग आढळून आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पंचमुखी शिवलिंग सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे शिल्प तलावाच्या काठावर असलेल्या हेमांडपंतीय मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी या तलावात यमदेवाचे शिल्प आढळून आले होते.

चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मूल तालुक्यातील भेजगाव येथील प्राचीन तलावाचे खोदकाम सुरू आहे. या तलावाचा पाळीवर देखणे हेमाडपंथीय शिवमंदीर आहे. आठवडाभरापूर्वीच येथे यमदेवाचे शिल्प सापडले होते. बुधवारी खोदकाम करताना दुर्मिळ समजले जाणारे पंचमुखी शिवलिंग आढळून आले. हे शिल्प अतिशय देखणे असून टेराकोटाने बनविलेल्या या शिल्पावर लाल पॉलिश मारलेली आहे. पाच इंचाचे हे शिल्प आहे.

पंचमुखी शिवलिंगावर भगवान शिवाचे पाच शिल्प कोरले असतात. शिवाचे पश्चिम मुख हे पृथ्वी तत्त्व म्हणून पुजले जाते. उत्तर मुख हे जल तत्त्व, दक्षिण मुख हे तेजस तत्त्व, पूर्व मुख हे वायु तत्त्व आणि वरचे मुख हे आकाश तत्त्व म्हणून पुजले जाते, असे अभ्यासक अरूण झगडकर यांनी सांगितले.