पंढरपुरात एकाच गावातून 2300 ब्रास वाळू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर महसूल विभागाने वाळू चोरटय़ांच्या विरोधात कारवाईचा धडका लावला आहे. आज भीमा नदीकाठावरील आंबे (ता. पंढरपूर) गावात महसूल प्रशासनाने धाड टाकली. या गावात वेगवेगळ्या 27 ठिकाणी वाळूचा साठा करण्यात आलेली 2300 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या वाळूची किंमत सुमारे 13 लाख रुपये आहे.

याप्रकरणी हलगर्जीपणा करणारे संबंधित तलाठी, कोतवाल यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

भीमा नदीकाठी पंढरपूर तालुक्यातील 40 गावे आहेत. या गावांतून सातत्याने अवैध वाळूचोरी व साठा होत आहे. त्यामुळे महसूल विभागाने वेळोवेळी 165 कारवाया करून 1 कोटी 16 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच 33 गावांतील 84 जणांवर दंड न भरल्याप्रकरणी सातबाऱयावर बोजा चढविण्यात आला आहे. दंड न भरल्यास जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे.

आज आंबे गावात केलेल्या कारवाईमध्ये दोन तहसीलदार, 5 मंडल अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता.

चळे येथे शासनमान्य वाळू डेपो

z राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे भीमा नदीकाठी चळे (ता. पंढरपूर) येथे 14 हजार ब्रास वाळूची विक्री करण्यात येणार आहे. 660 रुपये प्रतिब्रास प्रमाणे वाळू मिळणार आहे. ज्या नागरिकांना वाळू पाहिजे आहे, अशा नागरिकांनी ‘आपले सरकार’ ऍपवर नोंदणी करावी, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.