
नीरा व भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरा खोऱ्यातील साखळी धरणांमधून व उजनी जलाशयातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे भीमा नदीदुथडी भरून वाहन आहे. नदीकाठच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूर चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. तर जूना दगडी पूल पाण्याखाली गेला आसुन् तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे आठ बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आसून बांधाऱ्यावरी वाहतूक बंध करण्यात आली आहे.
मागील चार दिवसांपासून भीमा व नीरा खोऱ्यातील धरणांच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. वरून येणाऱ्या पाण्याचा फ्लो पाहता धरणातील पाणीपातळी समतोल राखण्यासाठी मागील दोन दिवसांपासून उजनीतून भीमा नदीत 70 हजारापेक्षा जास्त व वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे सर्व पाणी नीरा नरसिंहपूरपासून एकत्रित भीमा नदी पात्रात वाहत असल्याने याचा फटका पंढरपूर तालुक्याला बसत आहे.
या पाण्यामुळे नदीकाठच्या परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या पीकांमध्ये पाणी शिरल्यामुळे पीकांचे नुकसान झाले आहे. तर अचानक आलेल्या पाण्यामुळे विद्युत पंप बुडाले आहेत. काही शेतकऱ्यांची पुराच्या पाण्यातून आपले साहित्य वाचविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र नदीकाठच्या परिसरात आहे.
आठ बंधारे पाण्याखाली
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे उंबरे, आव्हे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, विष्णूपद, अजनसोंड, बठाण आदी आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या सर्व बंधाऱ्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून बंधारा परिसरात महसूल कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.
नगर परिषद यंत्रणा सतर्क
भीमा नदीला आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरातील जूना दगडी पूल गेला असून नदी पात्रातील सर्वच मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नदी पात्राकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या पुराचे पाणी अंबाबाई पटांगण परिसरातील व्यासनारायण झोपडपट्टीत जाण्याची शक्यता असल्याने नगर पालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क केले असून आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवली आहे.