
तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. या बंदमुळे पंढरपूर तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्र्यांनी विना चौकशी एक उपजिल्हाधिकारी, चार तहसीलदार, चार मंडलाधिकारी यांचे निलंबन केले. याप्रकरणी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. निलंबन रद्द करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच नवीन नियुक्त तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर मिळावेत, या मागण्या देखील करण्यात आल्या आहेत. याची दखल न घेतल्यास19 डिसेंबरपासून संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे.
या आंदोलनामुळे तहसील कार्यालयासह सेतू, पुरवठा विभाग अशा सर्व विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे. याचा फटका पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
काम बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे विविध कागदपत्रे मिळत नाहीत. शेतकऱ्यांसह पंढरपुरातील नागरिकांना कर्ज किंवा वैद्यकीय मदतीसाठी व इतर कारणांसाठी लागणारे जमिनीचे उतारे मिळत नाहीत. तसेच शासनाच्या विविध योजनांसाठीची कागदपत्रे ही मिळत नसल्याने सर्वसामान्य जनतेची सर्व कामे खोळंबली आहेत. तरी शासनाने तातडीने या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करून हे आंदोलन थांबवावे.
-गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष, महर्षी वाल्मिकी संघ
बारामतीतही सामूहिक रजा आंदोलन
दरम्यान, बारामती महसूल अधिकारी कर्मचारी यांचे सामूहिक रजा आंदोलन असल्याने तहसील कार्यालय बंद राहिले असून यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. यावेळी प्रशासकीय भवन बारामती या ठिकाणी नागरिकांची कामे अनेक खोळंबली. आज चार दिवस उलटूनही अजूनही संप कायम असल्याने नागरिकांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.


























































