देवाला बाटवू नका, अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर देवाच्या पायावर मारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध

राज्यातील धार्मिक स्थळे दर्शनसाठी खुली करण्याच्या अनुषंगाने राज्य शासन सकारात्मक विचार करीत आहेत. ही बाब वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने समाधानाची आहे. तथापि पदस्पर्श दर्शन सुरु करण्यासाठी देव बाटणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. काही दिवस श्री विठ्ठल रखुमाईचे मुखदर्शन दिले तरी चालेल पण पदस्पर्श व्यवस्थेसाठी देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारलेले खपवून घेणार नाही, असा गर्भित इशारा वारकरी फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून गेल्या पाच महिन्यापासून पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर बंद आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच व्यवहार हळूहळू खुले केले जात आहे त्यामुळे धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्याची मागणी भक्तांतून मोठ्या प्रमाणात होते आहे. या मागणीची दखल घेत राज्यातील महाआघाडीचे सरकार या विषयाच्या अनुषंगाने सकारात्मक पावलं उचलत आहे. भविष्यात श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय झाला तर व्यवस्थापणासमोर नवा पेच उभा ठाकला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणे आणि सतत सॅनिटायझरचा वापर करणे सक्तीचे असणार आहे श्री विठ्ठल मंदिरात देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेण्याची प्रथा आहे एका भाविकाने दर्शन घेतले की लगेच देवाच्या पायावर  सॅनिटायझर फवारावे लागणार आहे. अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर फवारणीला वारकरी संप्रदायाचा विरोध आहे.

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अधिक असते. अल्कोहोल वारकरी संप्रदायात निषिध्द मानले जाते. कारण अल्कोहोल पासून दारु तयार केली जाते. त्यामुळे देवाच्या पायांवर सॅनिटायझर लावू नये अशी भूमिका वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींनी घेतली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही दिवस देवाचे पदस्पर्श बंद ठेवून फक्त दुरुन मुखदर्शन सुरु ठेवावे जेणे करुन भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि देवही बाटणार नाही. या भावनिक मुद्द्याकडे वारकरी फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कुंभारगावकर महाराज, लबडे महाराज, विनायक महाराज गोसावी आदींनी मंदिर समितीचे लक्ष वेधले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या